१२ जणांना घेतले ताब्यात : उपवनसंरक्षक वर्मा यांची धडक कारवाईभंडारा : राखीव वनक्षेत्रात पर्यटन व मेजवानी करण्यावर बंदी आहे. मात्र वनविभागाचा हा कायदा वेशीवर टांगून भंडारा शहरातील १२ युवक रावणवाडी पर्यटन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव वनक्षेत्रात धुडघूस घालीत होते. या युवकांसह पाच वाहनांना भंडारा वनविभाने ताब्यात घेतले. ही कारवाई आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी ही कारवाई केली. रावणवाडी पर्यटन क्षेत्रांतर्गत येत असलेल्या राखीव वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट नंबर २८७ मध्ये ही कारवाई करण्यात आली. भंडारा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सहवनपरिक्षेत्र माडगीच्या रावणवाडी बिटात हा प्रकार घडला. येथे पर्यटनाला बंदी असतानाही भंडारा शहरातील युवक येथे मास शिजवित होते. दरम्यान त्यांनी वनविभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जोरजोरात चारचाकी वाहनातील साऊंड सिस्टीमचा आवाज करून अक्षरश: धुळघुस घातला होता. याची माहिती भंडारा उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना होताच त्यांनी भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी डब्ल्यु.आर. खान, क्षेत्र सहायक गौरी नेवारे, वनरक्षक टी.एच. घुले, गडेगावचे प्रकाश निस्कासन अधिकारी पी.जी. कोडापे, माडगीचे क्षेत्र सहायक पी.एस. मेश्राम यांच्यासह धुळघुस सुरू असलेल्यास्थळी धाड घातली. यावेळी केलेल्या कारवाईत वर्मा यांनी १२ युवकांना ताब्यात घेतले व सोबतच एका चारचाकी वाहनासह पाच दुचाकी स्वयंपाक शिजविण्याचे साहित्य व शिजविलेले मास जप्त केले. ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये आकाश रविंद्र साबळे (२५), स्वप्नील विनायक सार्वे (२६), प्रतीक सेवक हातझाडे (२३) रा. आॅफिसर कॉलोनी तकिया वॉर्ड, भंडारा. निलेश नानाजी कुंभरे (२३) बालाजी नगर खात रोड भंडारा, सचिन सुदर्शन वैद्य (२८) शांतीनगर, रजत गंगाधर चंद्रीकापुरे (२३) कपीलनगर तकिया वॉर्ड, रंजित वसंता नागदेवे (३९) दिघोरी, कुणाल राजेश कोणार (२३) एमएसईबी कॉलोनी भंडारा, अरविंद गंगाधर नागपूरे (३५) कृष्णमंदीर वॉर्ड भंडारा, मोहन रामभाऊ कारेमोरे (३६), अजय बबन माकडे (२३) रा. तात्याटोपे वॉर्ड भंडारा, दयानंद विभुजी शहारे (३६) तुळशीनगर खात रोड भंडारा यांचा समावेश आहे. यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच ३१ सीएम ९६२१ या चारचाकी वाहनासह एमएच ३६ एस ४८८०, एमएच ३६ एम ४५९१, एमएच ३६ आर ८५८९, एमएच ३६ ई ६१४३, एमएच ३६ एन ४८४६ या पाच दुचाकींचा समावेश आहे. या कारवाईत बीट गार्ड आर.आर. शिंगाडे, आर.आर. जाधव, एन.आर. साखरवाडे, अनिल शेळके व चंदू सार्वे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
रावणवाडी पर्यटनस्थळी तरूणांचा धिंगाणा
By admin | Published: November 09, 2016 12:41 AM