तुमसर: तुमसर-देव्हाडीदरम्यान ऑटोतून प्रवास करताना एका महिलेची बॅग रस्त्यात पडली. देव्हाडी येथे पोहोचल्यावर बॅग नसल्याच्या त्यांच्या ध्यानात आले. तत्काळ देव्हाडी येथील पोलीस चौकीत ही सूचना देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला; परंतु थोड्याच वेळात एका युवकाने मुद्देमालासह बॅग पोलीस चौकीत येऊन दिली. दोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग पोलिसांनी महिलेच्या स्वाधीन केली.
नागपूर येथील कुंदा गजभिये येरली येथे लग्नानिमित्त केल्या होत्या. परत नागपूरला जाताना तुमसरवरून त्या ऑटोने निघाल्या; परंतु रस्त्यात त्यांची बॅग खाली पडली. देव्हाडी येथे पोहोचल्यावर त्यांना बॅग दिसली नाही. त्यामुळे त्या घाबरल्या. देव्हाडी येथील पोलीस चौकीत त्यांनी सूचना दिली. चौकीमधील किरण अवताडे, जितू मल्होत्रा, समाधान लांडगे, नीलेश बसीने यांनी तपासाची चक्रे फिरविली. ऑटोचालकाला पाचारण केले. यांच्याकडून माहिती घेतली. दरम्यान, मल्लेवार नामक युवक पोलीस चौकीत पोहोचला. त्यांनी ही बॅग फादर एग्नेल शाळेजवळ रस्त्यात मिळाल्याचे सांगितले. या बॅगेत नगदी व दोन लाखांचे दागिने होते. खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी कुंदा गजभिये यांना मुद्देमाला असलेली बॅग स्वाधीन केली. प्रामाणिकता आजही जिवंत असल्याचा प्रत्यय यावेळी आला. तंटामुक्तीचे अध्यक्ष मोरेश्वर ठवकर सामाजिक कार्यकर्ता आलमखान, सरपंच रिता मसरके, देवसिंग सव्वालाखे उपसरपंच लव बसीने यांनी मलेवार यांचे कौतुक केले.