तुमसर रोड स्थानकातील घटना : थोडक्यात बचावल्या पेट्रोल वाघिणी तुमसर : रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या पेट्रोल वाघिणीवर चढलेल्या एका ३५ वर्षीय इसम विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श होऊन गंभीर जखमी झाला. तो ९० टक्के भाजला. हा थरार तुमसर रोड रेल्वेस्थानकावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त युवकाचे नाव सारीख मोहम्म्द जीगर मेमन (३५) रा. शिवनीटोला कटंगी (मध्य प्रदेश) असे आहे.विशेष म्हणजे पेट्रोल वाहून नेणाऱ्या वाघिणींना येथे आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सोमवारी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येवून थांबली. नागपूरहून सारीख मोहम्मद मेमन तुमसर रोड येथे उतरला. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाण्याकरिता त्याने फुटवे ब्रीजचा वापर न करता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभ्या पेट्रोल वाहतूक करणाऱ्या वाघिणीवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. वाघिणीच्यावर वीज वाहून नेणाऱ्या ओव्हरहेड तारांचा संपर्कात सारीख आल्याने क्षणात आग लागली. मोठा आवाज झाल्यावर तो दूर फेकला गेला. रेल्वेस्थानकावर एकच धावपळ उडाली. सारीख हा गंभीररित्या भाजला. उपचाराकरिता त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चितांजनक असल्याचे समजते. पेट्रोल वाहून नेणाऱ्या वाघिणीला आग लागण्याची येथे शक्यता होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तुमसर रोड रेल्वेस्थानकावर नेहमीच प्रवासी रेल्वेगाड्या डाऊन मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ऐवजी दोन वर थांबविल्या जातात. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्याचा फायदा झाला नाही. कटंगी शिवनीटोला येथील सारीख मेमन हा युवक ग्रामीण भागातील रहिवासी आहे. रेल्वेस्थानकावर सुरक्षा कर्मचारी तैनात राहतात, ते कुठे गेले हा मोठा प्रश्न येथे उपस्थित होतो. (तालुका प्रतिनिधी)
वीज तारांच्या स्पर्शाने युवक भाजला
By admin | Published: March 29, 2017 12:33 AM