लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्गामुळे निवडणूक हाेऊ न शकल्याने गत १४ महिन्यांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयाेगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सुधारित आरक्षण साेडत कार्यक्रम जाहीर केला आहे. तर दुसरीकडे मंडईच्या माध्यमातून इच्छुक गावागावांत जाऊन माेर्चे बांधणी करीत आहेत.
भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता १४ महिन्यांपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक चालवित आहेत. आता काेराेना संसर्ग कमी झाला असून, भंडारा जिल्हा काेराेनामुक्त आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच ८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी एक पत्रही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निर्गमित केले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेवर गतवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता हाेती. काँग्रेसचे रमेश डाेंगरे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हाेते. पाच वर्षांचा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र त्याचवेळी राज्यात काेराेना संसर्ग शिगेला पाेहाेचला हाेता. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार अशी शक्यता हाेती. मात्र ११ जुलै २०२० राेजी जिल्हा परिषद बरखास्त करून १२ जुलै राेजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
आता सुधारित आरक्षण साेडत कार्यक्रम जाहीर झाल्याने लवकरच निवडणुकाही घाेषित हाेतील अशी अपेक्षा आहे. सर्वच पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गत सहा महिन्यांपासून तयारी करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यासह इतर पक्ष आणि आघाड्याही निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. युती - आघाडी हाेणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार, हे मात्र अद्यापही निश्चित नाही. एकदा निवडणुकीची तारीख घाेषित झाल्यानंतर सर्व काही ठरणार आहे. परंतु इच्छुक मात्र आतापासूनच कामाला लागले आहेत. कधीही न दिसणारे आता गावागावात दिसायला लागले आहेत. दिवाळीनंतर सुरू झालेल्या मंडईनिमित्त ही मंडळी आणखी जागरूक झाली असून, गावकऱ्यांना वर्गणी देत या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. एकंदरीत लवकरच या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
सुधारित आरक्षण साेडत १२ नाेव्हेंबर राेजी
भंडारा जिल्हा परिषद व पवनी पंचायत समितीमधील नागरिकांचा मागासप्रवर्ग, महिला तसेच सर्वसाधारण महिलांसाठी साेडत पद्धतीने आरक्षणाची कार्यवाही १२ नाेव्हेंबर राेजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियाेजन सभागृह आणि पंचायत समितीसाठी पवनी तहसील कार्यालयात विशेष सभा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रहिवाशांना या सभेत हजर राहावयाचे असल्यास त्यांना काेराेना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.