लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सभापती निवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून, ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून पुन्हा सदस्य सहलीसाठी निघाले आहेत. जातीय समीकरण, पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरांना सामावून घेताना काँग्रेस नेत्यांना सभापती निवडताना मोठी कसरत करावी लागणार आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. चार सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला तीन सभापतीपदे येत आहेत. या तीन सभापतींची निवड करण्याचे दिव्य काँग्रेसपुढे आहे. यावरूनही रुसवे-फुगवे आणि नाराजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या सदस्यांना आता पुन्हा थंड हवेच्या ठिकाणी सहलीसाठी पाठवले आहे.सभापती निवडताना काँग्रेसला अनेक समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेली नाराजी, जातीय समीकरण, तालुक्याचे संतुलन साधावे लागणार आहे. कुठल्याही तालुक्यावर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. पवनी तालुक्याला अध्यक्षपद तर भाजप बंडखोर गटामुळे उपाध्यक्षपद तुमसर तालुक्याला मिळाले आहे. आता पाच तालुक्यांतून चार सभापती निवडायचे आहेत. त्यातही एक सभापतीपद भाजप बंडखोराकडे जाणार आहे. अशा परिस्थितीत काही सदस्यांची नावे सभापती पदासाठी काँग्रेसमधून चर्चेत आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील बपेरा गटाचे रमेश पारधी, लाखनी तालुक्याच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये, साकोली तालुक्यातील वडद गटाचे मदन रामटेके यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीत ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या, तशाच सभापतीपदाच्या निवडीतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीत सामसूम; नेत्यांची चुप्पी- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. मात्र, सभापतीपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीत सामसूम दिसत आहे. नेत्यांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेसने सदस्य सहलीसाठी पाठवले असले तरी राष्ट्रवादीचे सदस्य मात्र आपल्या गावातच आहेत.