वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका : चार पंचायत समिती सदस्यांचाही समावेशमोहाडी : तालुक्यातील बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आलेल्या सरिता कुंडलिक चौरागडे यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी पारित केले आहे. या आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, मोहाडीचे तहसिलदार, गटविकास अधिकारी व सरीता चौरागडे यांना पाठविण्यात आले आहे.सरीता चौरागडे या बेटाळा जिल्हा परिषद क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढली होती. नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव गटातून त्या निवडून आल्या होत्या. तथापि निवडून आल्याचे घोषित तारखेपासून सहा महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र चौरागडे यांनी सादर केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ सुधारणा कलम १२ (अ) नुसार त्यांची मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पदावर झालेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करून सदस्य पदावर राहण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे ११ जून २०१५ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ४ जुलै २०१५ रोजी मतदान व ६ जुलै २०१५ रोजी मतमोजणी करण्यात आली. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून सहा महिन्याच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कसूर केल्यास ती निवड रद्द होते. सरीता चौरागडे यांची ६ महिने पूर्ण होण्याची मुदत ५ जानेवारी २०१६ ला संपुष्ठात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून २०१६ नुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे कारणे व पुराव्यासह १५ दिवसाचे आत लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस दिली होती. चौरागडे यांनी १४ जुलै २०१६ रोजी उत्तर सादर केले. याप्रकरणाबाबत सुनावणी ५ आॅक्टोंबर २०१६ रोजी घेण्यात आली. सुनावणीच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर करण्यात आले नाही. तथापि विभागीय जाती पडताळणी समितीकडे प्रस्तावासरीता चौरागडे यांनी पाठविला होता. पंरतु वारंवार पाठपुरावा व मागणी करूनही जात प्रमाणपत्र दिले नाही व ७ आॅक्टोंबर २०१६ जाती समिती पडताळणी कार्यालयात सुनावणीसाठी बोलाविले. सुनावणीच्यावेळी प्रमाणपत्राची मागणी करूनही प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्यात आले नाही. उच्च न्यायालय (अनंत उल्हालकर व अन्य विरूध्द निवडणूक आयुक्त) यात उच्च न्यायालयाच्या पूर्णपिठाने ९ डिसेंबर २०१६ रोजी निवाडा दिला होता. सदर निवाडा चौरागडे यांनाही लागू असल्याचे आदेशात नमूद आहे. या निवाड्याचा आधार घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सरिता चौरागडे यांचे बेटाळा जिल्हा क्षेत्राचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यातील चार पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्त्व रद्द झाले असून त्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)
जि.प. सदस्य चौरागडे यांचे सदस्यत्व रद्द
By admin | Published: February 03, 2017 12:35 AM