गंगाझरी पोलिसांचे दुर्लक्ष : जीवे मारण्याची धमकीएकोडी : जादुटोणा केल्याच्या संशयावरुन एका संतप्त जमावाने दोघांच्या घरात शिरून जबर मारहाण करण्यात आले. ही घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकोडी येथे १ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोकांमध्ये आजच्या वैज्ञानिक काळातही किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे, याची प्रचिती येते.एकोडी येथील रहिवासी मुरलीधर गोमा सांगोडे (५९) आणि चुन्नीलाल शिवलाल बिसेन (६०) या दोघांनी ‘माझ्या बायकोला भूत भरविले’ असे म्हणत आरोपी ४० ते ५० लोकांच्या जमावासह मुरलीधर सांगोळेच्या यांच्या घराकडे गेले. घराचे दार आतून बंद होते. त्यामुळे जमावापैकी श्रीराम बन्सीलाल खजरिया, अंगलाल बन्सीलाल खमरीया, सुनिता श्रीराम खजरिया, सीमा अंबालाल खजरिया व अशोक उके सर्व रा. एकोडी यांनी दाराला लात मारून उघडले. यानंतर घरात शिरुन कपडे फाटतेपर्यंत मुरलीदासला मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ देवून तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून तुझ्याच चौकात फेकून देवू, अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आई-बहिण व नाना प्रकारची शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी सांगोळे यांच्या नातीनने माझ्या आजोबाला का मारता, असे विचारले असता तिला अशोक उके याने धक्का मारत खाली पाडले, असा आरोप आहे.एकाएकी झालेला हल्ला पाहून मोठ्याने आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे शेजारी लोकांनी धाव घेतली. त्यामुळे मारहाण करणारे व सोबत असलेला ४०-५० लोकांचा जमाव निघून गेला. यानंतर या जमावाने आपला मोर्चा चुन्नीलाल शिवलाल बिसेन यांच्या घराकडे वळला. त्यात चुन्नीलाल बिसेन यांना जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी सदर आरोपींनी दिली. या प्रकरणाची तक्रार मुरलीधर गोमा सांगोळे यांनी त्याच रात्री १० वाजताच्या सुमारास गंगाझरी पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (कलम ५०४, ५०६) नोंद केला. तर चुन्नीलाल बिसेन यांनी २ जुलै रोजी या प्रकरणाची तक्रार दाखल केली. यामुळे मुरलीधर सांगोळे व चुन्नीलाल बिसेन यांनी ज्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्चचिन्हया प्रकरणाची गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार देवून एक आठवड्याचा कालावधी लोटत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अर्जदारांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला असून पोलिसांशी गैरअर्जदारांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रकरण थंडबस्त्यात घालून कारवाई न करता तडजोड करून मार्ग काढण्याचा सल्ला पोलीसच देत आहेत. त्यामुळे गावातही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे.
जादूटोणा केल्याच्या संशयावरून जबर मारहाण
By admin | Published: July 10, 2016 12:24 AM