भंडारा : भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवार (दि.४) मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारला दुपारच्या सुमारास तालुका मुख्यालयातून पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील एकूण १ हजार मतदान केंद्रापैकी ४९ मतदान केंद्र संवेदनशील, ६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व २३ मतदान केंद्र नक्षल प्रभावित असून त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ४ जुलै रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील, अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष सुरक्षा राहणार आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपनी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण ३ लाख ८८ हजार १८ पुरुष मतदार तर ३ लाख ७२ हजार ४३१ महिला मतदार असे एकूण ७ लाख ६० हजार ४४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शनिवार मतदानाचे दिवशी मतदान केंद्र इमारतीच्या बाहेर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांना मतदार यादीतील त्यांची नावे शोधण्यासाठी आणि संबंधित मतदान केंद्रात पाठविण्यासाठी मदत करतील. निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जि.प., पं.स. निवडणुकीसाठी आज मतदान
By admin | Published: July 04, 2015 1:17 AM