सचिन पायलट यांचे बंड आणि कॉंग्रेस नेत्यांच्या सूचक प्रतिक्रिया!
By रवी टाले | Published: July 17, 2020 05:04 PM2020-07-17T17:04:41+5:302020-07-17T17:12:40+5:30
राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर एक व्यंगचित्र समाजमाध्यमांमध्ये खूप अग्रेषित केले गेले. त्या व्यंगचित्रात कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असलेले गांधी ...
राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर एक व्यंगचित्र समाजमाध्यमांमध्ये खूप अग्रेषित केले गेले. त्या व्यंगचित्रात कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असलेले गांधी कुटुंब दिवाणखान्यात बसलेले आहे आणि प्रियंका गांधी मातोश्री व बंधुराजांना उद्देशून म्हणतात, ‘आपण एक शपथ घेऊ या....किमान आपण तिघे तरी कधीही पक्ष सोडून जाणार नाही!’ त्यामध्ये विनोद निर्मितीसाठी वापरलेली अतिशयोक्ती सोडून द्या; पण गत काही वर्षातील कॉंग्रेस पक्षाची अवस्था बघता, कॉंग्रेसच्या पाठीराख्यांच्या मनातही, एक दिवस खरेच तशी स्थिती उद्भवेल की काय, अशी शंका चुकचुकल्याशिवाय राहत नाही.
एकेकाळी गांधी कुटुंबाच्या विरोधात ब्रदेखील काढण्याची हिंमत कॉंग्रेस पक्षात कुणी करू शकत नसे. हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या ज्या नेत्यांनी तशी हिंमत केली ते पक्षात टिकू शकले नाहीत. त्यापैकी बहुतेकांची एक तर राजकीय कारकीर्द संपुष्टात आली किंवा त्यांना पुन्हा दाती तृण धरून गांधी कुटुंबास शरण जावे लागले. गत काही काळापासून मात्र गांधी कुटुंबाच्या वर्चस्वास पक्षातून आव्हान मिळण्याचे प्रसंग वरचेवर उद्भवू लागले आहेत.
सचिन पायलट यांच्या बंडाच्या आगेमागे काही कॉंग्रेस नेत्यांनी केलेली वक्तव्ये पुरेशी सूचक आहेत. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नेहरू-गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले कपिल सिब्बल यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून व्यक्त केलेली प्रतिक्रिया भुवया उंचावणारी होती. तबेल्यातून सगळे घोडे पसार झाल्यानंतरच आपल्याला जाग येईल का, असा प्रश्न त्यांनी त्या टिष्ट्वटमधून उपस्थित केला होता. या प्रश्नाचा रोख गांधी कुटुंबाकडे होता, हे स्पष्ट आहे.
सिब्बल यांच्यानंतर शशी थरूर यांनीही टिष्ट्वटरच्या माध्यमातून पायलट यांच्या बंडावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘सचिन पायलट हे पक्षाच्या सर्वोत्तम आणि सर्वात हुशार नेत्यांपैकी एक होते. त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ते पक्षातून गेल्याचे आपल्याला दु:ख झाले आहे.’’ असे टिष्ट्वट थरूर यांनी केले. गंमत म्हणजे पायलट यांनी अद्यापही पक्ष सोडलेला नाही अथवा त्यांना पक्षानेही बाहेर काढलेले नाही! कॉंग्रेसच्या विरोधात झेंडा उंच केलेल्या नेत्याची दुसऱ्या नेत्याने तारीफ केल्याचे उदाहरण कॉंग्रेसच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात तरी सापडणे कठीण आहे. थरूर बोलघेवडे म्हणून ख्यात असले तरी, ज्या नेत्याने थेट पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे, त्या नेत्याची प्रशंसा करणे हे जरा जास्तच झाले!
ं कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती चिदम्बरम यांनी तर सिब्बल आणि थरूर यांच्याही पुढे एक पाऊल टाकले. त्यांनीही व्यक्त होण्यासाठी टिष्ट्वटरचाच आधार घेतला. ते म्हणतात, ‘‘गूगल ही एक यशस्वी कंपनी का आहे? कारण ती कंपनीतील प्रतिभेला फुलण्याचा वाव देते. यातून काही शिकायला हवे.’’ सिब्बल यांच्याप्रमाणेच कार्ती चिदम्बरम यांचाही रोख नेहरू-गांधी कुटुंबाकडे होता, हे स्पष्ट आहे; पण त्यांची प्रतिक्रिया सिब्बल यांच्या तुलनेत अधिक खोचक होती.
कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे टिष्ट्वटही थेट गांधी कुटुंबालाच लक्ष्य करणारे होते. ते म्हणतात, ‘‘सचिन पायलट यांना समजवल्यास आणि थांबविल्यास बरे होईल. बहुधा पक्षातील काही लोक असा विचार करीत आहेत, की ज्यांना जायचे असेल, त्यांनी जावे. आम्ही थांबविणार नाही. सध्याच्या परिस्थितीत हा विचार चुकीचा आहे. एक-एक जण सोडून गेल्याने पक्ष संपणार नाही, हे खरे; पण अशा प्रकारे एक-एक जण सोडून गेल्यास पक्षात शिल्लक तरी कोण उरेल?’’
कॉंग्रेस पक्षात यापूर्वी कधी बंडाचा झेंडा फडकलाच नाही अथवा नेहरू-गांधी कुटुंबाच्या विरोधात कुणी आवाज काढलाच नाही, असे अजिबात नाही; मात्र इतिहासात जेव्हा जेव्हा असे घडले, तेव्हा ती सातत्यपूर्ण प्रक्रिया नव्हती आणि अशा प्रत्येक बंडानंतर गांधी कुटुंबाने मोठी उसळी घेतली. गत दोन लोकसभा निवडणुकांमधील लागोपाठ पराभवांनंतर मात्र गांधी कुटुंबाच्या विरोधात आवाज उठवला जाण्यात एक प्रकारचे सातत्य आले आहे. त्यापेक्षाही मोठी बाब ही आहे, की एखाद्या नेत्याने पक्ष नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर त्या नेत्याचे पक्षातूनच समर्थन होत आहे आणि समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात कुणी आवाजही उठवत नाही! कॉंग्रेस पक्षापुरती ही बाब अकल्पनीय आहे.
अर्थात ही बाबदेखील तेवढीच खरी आहे, की ज्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्या बंडाच्या निमित्ताने नेहरू-गांधी कुटुंबाकडे रोख ठेवून वक्तव्ये केली, त्यापैकी एकही नेता जनमानसात स्थान असलेला नाही. त्यामुळे नेहरू-गांधी कुटुंबाला तातडीने चिंता करण्याची गरज नसली तरी, पक्षावरील पकड कायम ठेवण्यासाठी या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार मात्र करावा लागणार आहे!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com