बंदचा शाळांमध्ये उपस्थितीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:22 AM2018-09-11T01:22:32+5:302018-09-11T01:22:59+5:30
काँग्रेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम नाशिकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर झाल्याचा दिसून आला.
नाशिक : काँग्रेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम नाशिकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर झाल्याचा दिसून आला. बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाल्याचे दिसून आले. परंतु, बंदमधून शाळा-महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आले असल्याने जवळपास सर्वच शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे दिसून आले. भारत बंदमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती, तर काही खासगी वाहनांमालक व चालकांनीही स्वयंस्फूर्तीने बंद पाळला त्यामुळे शहरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विध्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. शहरातील काही शाळा महाविद्यालयांमध्ये चाचणी परीक्षांचे नियोजन असल्याने अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांनी प्रवास करून उपस्थिती लावल्याचे दिसून आले. परंतु अन्य बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून शहरातील विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर बंदचा विशेष परिणाम झाल्याचे दिसून आले. यात माध्यमिक विद्यालयांसह कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी खबरदारी म्हणून त्यांना शाळेत जाण्यापासून रोखल्यानेही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. शालेय वाहतूक सुरळीत होती.