या प्रियंकाचं काय करायचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 03:52 AM2019-01-27T03:52:38+5:302019-01-27T03:54:26+5:30
प्रियंका गांधी दारू पितात का, पबमध्ये जातात का, त्यांचे तोकड्या कपड्यांमधील फोटो आहेत का, त्यांची काही वादग्रस्त क्लीप मिळू शकते का, याचे शोध सुरू झाले आहेत. फोटोशॉप यंत्रणा धडधडू लागल्या आहेत.
- मुकेश माचकर
'आमच्याकडे तिच्यापेक्षा जास्त सुंदर स्टार कॅम्पेनर महिला आणि मुली आहेत. हिरोईन आहेत, कलावंत आहेत,’ उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय कटियार यांनी हे तारे तोडले होते. निमित्त होतं प्रियंका गांधी यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रचारक म्हणून सहभागी होण्याचं. आता तर प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदावरच नियुक्ती झालेली आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्या बंधू राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरणार, निवडणूकही लढवणार म्हटल्याबरोबर कुजबूज आघाडीची बोंबाबोंब आघाडी बनलेली दिसते आहे.
बिहारच्या विनोद नारायण झा नामक नेत्याने प्रियंका यांच्याकडे देखण्या चेहऱ्याव्यतिरिक्त काहीच नाही, राजकीय कामगिरी शून्य आहे, याकडे बोट दाखवलं आहे. शिवाय त्यांच्या सौंदर्याचा तरी पडून पडून किती प्रभाव पडणार आहे, असाही त्यांचा सवाल आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी म्हणतात की, राजकारणात डुप्लिकेट चालत नाहीत, इंदिरा गांधी असणं वेगळं आणि इंदिरा गांधींसारखं दिसणं वेगळं. गंमत म्हणजे, या दोघींत तुलना नाही, असं सांगून पुढे त्यांनी इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी हे कसे तत्त्वनिष्ठ राजकारणी होते आणि प्रियंका यांचे पती रॉबर्ट वड्रा हे कसे बदनाम उद्योगपती आहेत, अशी तुलनाही करून टाकली आहे.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अजयसिंग बिश्त यांनी तर शून्याला शून्य येऊन मिळाल्यावर काय फरक पडणार, असं भाष्य केलं आहे. त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाला एक आकडी जागा मिळणार आहे, असे पोल प्रसिद्ध झाल्यापासून त्यांची विचारशक्ती शून्याच्या आसपास घुटमळू लागलेली असावी. तोच प्रकार सोशल मीडियावरही सुरू आहे. प्रियंका गांधी दारू पितात का, पबमध्ये जातात का, त्यांचे तोकड्या कपड्यांमधील फोटो आहेत का, त्यांची काही वादग्रस्त क्लीप मिळू शकते का, याचे शोध सुरू झाले आहेत. फोटोशॉप यंत्रणा धडधडू लागल्या आहेत. निवडणुकीआधी असं काही घडेल, याचा विचार भाजपच्या प्रचार यंत्रणेने केला नसावा. त्यामुळे मंडळी अचानक नव्याने कामाला लागली आहेत. मग, नवी बारबाला प्रचारात उतरली, वगैरे साधारण या मंडळींच्या विचारसरणीला साजेसा चिखल चिवडायला सुरु वात झालेली आहेच.
काँग्रेस पक्ष हा घराण्याचा पक्ष आणि आमचा पक्ष परिवार, हा विनोदी युक्तिवाद तर साक्षात पंतप्रधानच करताना दिसतात. प्रियंका गांधी नको, वड्रा म्हणा, गांधी आडनाव का लावतात त्या, हा प्रश्न विचारणाºयांना तोच प्रश्न पुनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीत पडत नाही. त्यांच्याकडे, त्या राजकारणात आल्या तेव्हा वडिलांच्या नावापलीकडे काय राजकीय कर्तबगारी होती, या प्रश्नाचं उत्तर सुशील कुमार मोदी आणि गँगकडे असण्याची शक्यता नाही.
प्रियंका गांधी म्हणजे इंदिरा गांधी किंवा त्या नावाने आणलेली आंधी, असा नाच काँग्रेसजन करू लागले आहेत, ते स्वाभाविक आहे, पण ते सत्य नव्हे. प्रियंका गांधींपाशी इंदिरा गांधींची आठवण करून देणारी चेहरेपट्टी आणि गांधी हे आडनाव, नेहरू-गांधी घराण्याचा वारसा यापलीकडे काही नाही. प्रियंका यांनी आपल्या तेज:पुंज वक्तव्याने कधी कुठे मोठी छाप पाडली आहे किंवा राजकीय यश कमावलं आहे, असं काही दिसत नाही. साहजिकच प्रियंका गांधी यांच्या सरचिटणीसपदी नियुक्तीच्या आधी देशाचे जे काही राजकीय समीकरण असेल, त्यात त्यांच्या नियुक्तीने दोन टक्क्यांचाही फरक पडलेला असण्याची शक्यता नाही. त्यांची पाटी पूर्णपणे कोरीच आहे.
मात्र, काँग्रेसजनांना गांधींशिवाय काँग्रेस ही कल्पना सहन होत नाही. नाहीतर सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आपल्या कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवलं होतं, त्या काळात, पी. व्ही. नरिसंह राव यांच्यासारखा सक्षम नेता लाभलेला असताना काँग्रेस ‘स्वत:च्या पायावर’ उभी राहू शकली असती. गांधी घराण्याच्या सावलीतून पक्ष बाहेर पडू शकला असता. पण, गांधी घराण्याचं सिमेंट नसलं की या १५० वर्षं जुन्या इमारतीचे चिरे निखळू लागतात, हे आता स्पष्ट झालेले आहे. गांधी घराणं ही काँग्रेसची मजबुरी आहे, हे शशी थरूर यांच्यासारखा नेता उघडपणे सांगतो ते याचमुळे. सोनिया गांधी यांनी सत्तेबाहेर राहूनही सत्तेवर अंकुश ठेवण्याची भूमिका बजावली आणि काँग्रेसचा राजकीय चेहरा त्याच राहिल्या. त्यांच्यानंतर राहुल आणि आता साथीला प्रियंका असा हा अपेक्षित प्रवास आहे. सत्तेवर रिमोट कंट्रोल ठेवणाºया लिमिटेड कंपनी छापाच्या साथीदार पक्षांना ज्यांनी सोबत घेतले आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत करिष्म्यावरच ज्यांची मदार आहे, त्यांना या घराणेशाहीच्या व्यक्तिस्तोमाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. आज यूपीएच्या गोटात असलेले किंवा महागठबंधन करणारे पक्ष कधीतरी एनडीएच्या गोटात होते, यापुढेही ते तिकडे वळणार नाहीत, अशी शक्यता नाही. त्यामुळे ते तिसरी आघाडी बनवतात किंवा काँग्रेसशी आघाडी करतात तेव्हा घराणेशाहीचं प्रतीक असतात आणि भाजपबरोबर येतात तेव्हा वाल्याचे वाल्मिकी बनतात, यावर आता तिसरीतील मुलंही हसू लागली आहेत. शिवाय परिवारवादी भाजपमध्ये महाजन, मुंडेंप्रमाणे स्वदेशी घराण्यांची कमतरता नाही.
प्रियंका गांधी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांना आज लोक दुर्गा वगैरे मानत असले, तरी त्यांचीही सुरु वात गुंगी गुडिया अशाच संभावनेने झाली होती. तेव्हा त्यांच्या स्त्रीत्वावर गलिच्छ शिंतोडे उडवण्यात तेव्हाच्या जनसंघाचे नेते आघाडीवर होते, हा काही योगायोग नाही. ती त्यांची संस्कृतीच आहे. नेहरूंची मुलगी यापलीकडे हिचं काय कर्तृत्व, ही किती नाजूक आहे, राजकारणाचा भार हिला पेलवेल का, असं या दादा कोंडकेछाप टीकेचं स्वरूप असायचं. तोच प्रयोग सोनिया गांधींना इटालियन बारबाला ठरवताना केला गेला आणि राहुल गांधी यांना पप्पू म्हणून हिणवताना केला गेला. परेश रावलसारखा खासदार ‘प्रियंका ट्रम्प कार्ड होत्या, तर इतके दिवस हे जोकर घेऊन का खेळत होते,’ असा सवाल विचारतो, तेव्हा हे परंपरागत औद्धत्यच विकट हास्य करत असतं. प्रियंकांच्या आगमनाने राजकीय नफानुकसान काय होणार, ते पुढे त्यांच्या कर्माने किंवा कर्तबगारीने होईलच- त्याची फिकीर काँग्रेसजनांनी करावी. मतदारांना यानिमित्ताने संस्कृतीबाज सत्ताधाºयांच्या संस्कृतीचं दर्शन घडतंय, ते काही कमी मोलाचं नाही.
विनय कटियार यांनी दोन वर्षांपूर्वी जेव्हा ‘‘आमच्याकडे हिच्याहून सुंदर स्टार कॅम्पेनर आहेत,’’ असे तारे तोडले होते, तेव्हा प्रियंकाने उत्तर दिलं होतं, ‘‘ज्या कणखर, धाडसी आणि सुंदर स्त्रियांनी असंख्य कष्ट सोसून इथवर मजल मारली आहे, अशा आपल्या सहकारी स्त्रियांमध्ये या गृहस्थाला एवढंच (पक्षी : शारीरिक सौंदर्य) दिसत असेल, तर त्यांच्यावर हसण्यापलीकडे काय करता येईल? त्यांनी देशाच्या अर्ध्या लोकसंख्येविषयीची आपल्या परिवाराची विचारधारा काय आहे, ते दाखवून दिलं आहे.’’
याच संकुचित, पुरु ष वर्चस्ववादी विचारधारेचं हिणकस दर्शन आता प्रियंका गांधींमुळे वारंवार घडत राहील आणि प्रियंका यांनी प्रचारात प्रभाव पाडायला सुरु वात केलीच, तर ते अधिकाधिक हिणकस होत जाईल. त्यामुळे निवडणुकीचं नेमकं चित्र समजून घ्यायचं असेल, तर प्रियंका यांची किती बदनामी सुरू आहे, हे तपासून पाहिलं तरी ते समजत राहील.