मनोरुग्णांसाठी आयुष्य वेचणारा सेवाव्रती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:37 AM2018-07-29T04:37:32+5:302018-07-29T04:38:03+5:30
६० वर्षांनी २०१८च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाचे काम करणारे सेवाव्रती डॉ. भरत वाटवानी यांची झालेली निवड देश आणि रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.
- जयंत धुळप
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे येथील भूदान चळवळीचे प्रणेते विनोबाजी भावे यांना १९५८मध्ये पहिला रेमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर ६० वर्षांनी २०१८च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाचे काम करणारे सेवाव्रती डॉ. भरत वाटवानी यांची झालेली निवड देश आणि रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.
एखाद्या माणसाने मनोविकाराने ग्रस्त व्हावे, हा त्या माणसाचा दोष नसतो. अशा मनोरुग्णाने रस्त्यावरच्या बेवारस जनावरांपेक्षाही वाईट अवस्थेत जगत राहावं, कुणीतरी, काहीतरी दिलेलं खात राहावं, काही मिळालं नाही, तर रस्त्यावरील कचऱ्यातून मिळेल ते वेचून खावं, अशी विषण्ण, मन हेलावून टाकणारी परिस्थिती त्या मनोरुग्णाच्या वाट्याला येते. अशा वेळी त्याला काहीच कळत नसतं. पण ज्यांना कळतं त्यांच्यामधील माणुसकी तरी जागी झाली पाहिजे. मनोरुग्णांच्या या विदारक अवस्थेनेच संवेदनशील हृदयाचे डॉ. भरत वाटवाणी यांना अस्वस्थ केलं आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून आपलं पुढील आयुष्य या मनोरुग्णांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी वेचण्याचा निर्धार डॉ. भरत वाटवाणी यांनी पत्नी डॉ. स्मिता वाटवाणी यांच्या सहयोगाने केला.
डॉ. भरत वाटवाणी यांनी सन १९८८मध्ये मनोरु ग्णांसाठी काम सुरू केलं. हे काम करीत असताना एका मनोरुग्णाच्या बाबतीत घडलेल्या घटनेने डॉ. भरत वाटवाणी यांचं मन हेलावून गेलं. रस्त्यावर भटकणाºया एका मनोरु ग्णाने एक नारळ उचलला आणि तो पळत-पळत दूर निघून गेला. डॉ. वाटवाणी यांनी त्याचा पाठलाग केला असता, तो रस्त्यालगतच्या नाल्यातील दूषित पाणी पिताना दिसला. त्या मनोरु ग्णाची ही अवस्था पाहून वाटवाणी अस्वस्थ झाले; आणि त्यांनी त्या मनोरुग्णाला आपल्या दवाखान्यात आणले. त्याच्यावर उपचार सुरू केले. त्यांच्याकडे आलेल्या या पहिल्या मनोरुग्णाच्या उपचाराच्या निमित्ताने डॉ. वाटवाणी यांना कल्पना आली की आपण स्वीकारलेलं व्रत वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी अथक परिश्रम करणं अपरिहार्य आहे. मात्र ते आपलं ध्येय आणि व्रतापासून मागे हटले नाहीत. तेव्हापासूनच त्यांनी बेवारस मनोरुग्णांसाठी प्रभावी काम सुरू केले.
मनोरुग्ण सेवा पूर्णवेळ सेवेत रूपांतरित करण्यासाठी डॉ. भरत वाटवाणी यांनी २00५ साली कर्जत तालुक्यातील वेणगाव या गावात श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून मनोरुग्ण पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. डॉ. वाटवाणी श्रद्धा फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत. पुनर्वसन केंद्राचे काम सुरू झाल्यावर, मनोरुग्ण मानसिकतेचा सखोल अभ्यास आणि त्याबाबत संशोधन करून त्यांनी ‘मनोरुग्ण उपचार, पुनर्वसन आणि मूळ कुटुंबात पुन:प्रवेश’ अशी वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली निर्माण केली. मनोरुग्णांवर उपचार व त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामी या केंद्रात ३० जणांची चमू कार्यरत आहे. २००६मध्ये ४७ मनोरु ग्णांवर उपचार करून त्यांचं पुनर्वसन त्यांच्या स्वत:च्या कुटुंबात करण्यात केंद्राला यश मिळाल्याने डॉ. वाटवाणी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण चमूचा उत्साह द्विगुणित झाला आणि केंद्राच्या या मानवसेवा कार्यास मोठी गती मिळाली. आतापर्यंत देशातील २६ राज्ये त्याचबरोबर बांगलादेश, नेपाळ आणि इराण या देशांतील सात हजारांहून अधिक मनोरु ग्णांना या केंद्रात आणून उपचार करून त्यांचे पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्याचे काम वाटवाणी यांनी केले.
मनोरुग्णांकडे अद्यापही समाज आणि सरकार अपेक्षित त्या संवेदनशीलतेने पाहत नाही, याची खंत त्यांना वाटते. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या या मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाच्या कामाची दखल आजवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद वा राज्य शासनाकडून घेतली गेली नाही, हे एक वास्तव आहे. डॉ. वाटवाणी यांच्या या कार्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेत यंदाच्या मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाल्यावर आता तरी समाज आणि सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. रस्त्यात आढळणाºया मनोरुग्णांकडे पाहण्याचा समाज आणि त्यांच्यासाठी काम करणाºया मानवसेवाव्रतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.