Arjun Kapoor : 'केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड' हे एकत्र काम करतात, 'पठाण' वादावर अर्जून कपूरची प्रतिक्रिया चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:14 AM2023-01-10T11:14:49+5:302023-01-10T11:15:30+5:30
शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा एकंदर वाद पाहता बॉलिवूडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे.
Arjun Kapoor : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण (Pathaan) सिनेमाचा एकंदर वाद पाहता बॉलिवूडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सेन्सॉर बोर्डाने पठाणमध्ये बदल केल्याचे सांगितले आणि चर्चेला आणखी पेव फुटला. मात्र या वादात अनेक कलाकार समजुतदारपणा दाखवत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने या वादात प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत अर्जुन कपूरला पठाण वादावर प्रश्न विचारण्यात आला. या वादाचा एक अभिनेता म्हणून काय परिणाम होतो यावर तो म्हणाला, 'मला वाटतं आपण यावर चर्चा करणं हेच त्या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकार एकत्र मिळून काम करत आहेत. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. मला वाटतं लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र एक कलाकार म्हणून आम्हाला चित्रपटाच्या मागणीप्रमाणे काम करावं लागतं आणि आणि सोबतच नैतिकताही सांभाळावी लागते. अनावश्यक प्रश्नांमध्ये आपण अडकू नये जे उगाच द्वेष निर्माण करतील. '
तो पुढे म्हणाला, 'चित्रपटाच्या कथेप्रमाणे तसं दाखवणं हे आमचं काम आहे आणि नंतर ते लोकांसमोर येतं. चित्रपट रिलीज झाल्यावर लोक ठरवतील की सिनेमात विरोध करण्यासारखे काही आहे की नाही. चित्रपट तयार करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. आमचेही चित्रपट त्याला अपलाद नाहीत. फक्त प्रक्रियेवर विश्वास ठेवायला हवा आणि लोकशाहीचे नियम पाळायला हवे इतकेच. '
अर्जुन कपूर लवकरच आगामी 'कुत्ते' या सिनेमात दिसणार आहे. सध्या तो त्याच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे 'पठाण'चा आज ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. बेशरम रंग (Besharam Rang) या एका गाण्यामुळे झालेला वाद आता ट्रेलरवर काय परिणाम करतो हे बघणे महत्वाचे आहे. २५ जानेवारी रोजी पठाण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. लवकरच शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम सिनेमाचे प्रमोशन सुरु करतील अशी चर्चा आहे.