Anya Movie Review : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधानचा ‘अन्य’, कसा आहे चित्रपट? वाचा रिव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:34 PM2022-06-10T16:34:05+5:302022-06-10T16:50:58+5:30
Anya Movie Review : सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला असून, हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
कलाकार : अतुल कुलकर्णी, रायमा सेन, भूषण प्रधान, प्रथमेश परब, कृतिका देव, दीपक पांडेय, सुनील तावडे, गोविंद नामदेव, यशपाल शर्मा
लेखक, दिग्दर्शक : सिम्मी जोसेफ
निर्माता : शेलना के., सिम्मी
शैली : रिअॅलिस्टीकड्रामा
कालावधी : २ तास २० मिनिटे
दर्जा : अडीच स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे
काही चित्रपट समाजातील वास्तव दाखवण्याचं काम करतात. हा चित्रपटही मानवी तस्करी, बालमजूरी, गरीबी, कुपोषण आणि हे चित्र बदलण्यासाठी राज्यकर्त्यांच्या मनातील अनास्था यांसारख्या काही महत्त्वाच्या मु्द्द्यांवर प्रकाश टाकतो. सिम्मी जोसेफ यांनी सत्य घटनांच्या आधारावर लिहिलेलं कथानक या चित्रपटात सादर केलं आहे. त्यांना मराठीतील आघाडीच्या कलाकारांची उत्तम साथ मिळाली असली तरी चित्रपट काहीसा माहितीपटासारखा बनला आहे. मनोरंजन करणाऱ्या मूल्यांचा अभाव असल्यानं बऱ्याच ठिकाणी चित्रपट रुक्ष वाटतो.
खऱ्या अर्थानं समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात असणारा लेखक अरिंधम, त्याची मैत्रीण दिग्दर्शिका दिव्या आणि दिव्याचा बॅायफ्रेंड दीपक यांच्या माध्यमातून चित्रपटाचं कथानक सादर करण्यात आलं आहे. अरिंधमनं लिहिलेली डॅाक्युमेंट्री दिव्या दिग्दर्शित करत असते. याच्या निर्मितीची जबाबदारी दीपक स्वीकारतो. डॅाक्युमेंट्रीच्या माध्यमातून त्यांना समाजातील वास्तव चित्र जगासमोर आणायचं असतं. यासाठी त्यांना रिअल लोकेशनवर जाऊन हेरगिरी करत शूट करणाऱ्या तरुणाची गरज असते. सरताजची भेट झाल्यावर त्यांचा शोध संपतो. हेरगिरी करताना सरताजला बऱ्याच गोष्टी समजतात. त्यानंतर कुंटणखान्यात अडकलेल्या तरुणींना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न यशस्वी होतात का आणि डॅाक्युमेंट्रीचं काय होतं ते चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
लेखन, दिग्दर्शन : मानवीतस्करीसारखे मुद्दे यापूर्वी बऱ्याचदा चित्रपटांमध्ये आले आहेत. पुन्हा एकदा त्यावर फोकस करण्यासाठी कसदार पटकथेची गरज होती. त्याची उणीव चित्रपट पाहताना जाणवते.
चित्रपटाचं कथानक जरी सत्य घटनांवर आधारलेलं असलं तरी कामचलाऊ पटकथेच्या पायावर उभारलेला चित्रपटाचा डोलारा प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्याइतपत भक्कम नाही. मुद्देसूद बांधणीच्या पटकथेचा अभाव आणि अधे-मधे कोणताही संदर्भ न देता सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमुळं काही ठिकाणी माहितीपटाचा फिल येतो. चित्रपट जरी वास्तवदर्शी असला तरी थोड्या फार प्रमाणात मनोरंजक मूल्यांचा वापर करणं गरजेचं होतं. रोमांचक प्रसंगांच्या माध्यमातून उत्सुकता वाढवण्याची गरज होती. समाजात घडणाऱ्या गुन्हेगारीसोबत यात अन्यायग्रस्त घटकांच्या आकडेवारीचा पाढा वाचण्यात आला आहे. रिअल लोकेशन्सवरील सीन्स आणि व्यक्तिरेखांमधील काही संवाद चांगले झाले असले तरी पुढारी बाबूरामजीसोबतची दृश्ये, सरताजची शोधमोहिम, त्यानं घेतलेल्या मुलाखती, मुलींना सोडवण्याच दृश्ये, पोलिसांनी टाकलेल्या धाडी प्रभावी वाटत नाहीत. गीत-संगीतही श्रवणीय नाही. अशा चित्रपटांमध्ये कॅमेरावर्क फार महत्त्वाचं असतं, पण यात कॅमेऱ्याचीही जादू दिसत नाही.
अभिनय : सर्वच कलाकारांनी आपापल्या प्रतिभेला साजेसा अभिनय केला असून, हीच या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. समाजाविषयी मनात तळमळ असलेल्या समाजसुधारक विचारांच्या लेखकाची अतुल कुलकर्णीच्या वाट्याला आलेली भूमिका त्यानं चोख बजावली आहे. भूषण प्रधाननं साकारलेलं काही ठिकाणी ग्रे शेडेड वाटणारं पॅाझिटीव्ह कॅरेक्टर खूप छान झालं आहे. रायमा सेननं आपल्या नेहमीच्याच शैलीत दिव्या साकारली आहे. या सर्वांमध्ये प्रथमेश परबनं अक्षरश: बाजी मारली आहे. प्रथमेशनं साकारलेला सरताज त्याचा भविष्यातील मार्ग प्रशस्त करणारा आहे. तेजश्री प्रधाननंही एका वास्तववादी भूमिकेत चांगलं काम केलं आहे. छोटीशी असली तरी कृतिका देवनंही आपली भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. सुनील तावडेंनी साकारलेला राजकारणी आणखी चांगला रंगवण्याची गरज होती. यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव यांना फार वाव नव्हता.
सकारात्मक बाजू : कलाकारांनी प्रामाणिकपणं साकारलेल्या भूमिका आणि समाजातील वास्तव मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तळमळ.
नकारात्मक बाजू : लेखनापासून सादरीकरणापर्यंत आणि तांत्रिक गोष्टींपासून मनोरंजक क्षणांच्या अभावापर्यंत बऱ्याच उणीवा आहेत.
थोडक्यात : एखाद्या माहितीपटासारखा वाटणारा 'अन्य' चित्रपट म्हणून प्रभाव पाडण्यात तितकासा यशस्वी झाला नसला तरी समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचं वास्तव आणि त्याची आकडेवारी जाणूण्यासाठी हा चित्रपट पहायला हरकत नाही.