'बधाई हो'च्या कलाकाराला आला होता अर्धांगवायूचा झटका, वजन कमी झाल्याने ओळखणे होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:53 PM2019-08-13T15:53:04+5:302019-08-13T16:02:58+5:30
बधाई हो या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक झाले. याच चित्रपटातील एका कलाकाराला काही महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता.
बधाई हो या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण त्याचसोबत या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक झाले. नुकतेच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून या चित्रपटासाठी आयुषमान खुराणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर सुरेखा सिक्री यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुरेखा सिक्री यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली असून त्यांचे वजन देखील कित्येक किलोने कमी झाले आहे.
बालिकावधू या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. याच मालिकेत जग्याची भूमिका साकारलेल्या शंशाक व्यासने सुरेखा सिक्री यांचे काही फोटो नुकतेच त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत त्या खूपच बारीक दिसत आहे. सुरेखा सिक्री यांना गेल्यावर्षी ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर अर्धांगवायूचा झटका देखील आला होता. त्यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे की, मी गेल्या वर्षी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना सेटवरच मी चक्कर येऊन पडले होते. मला ब्रेन स्ट्रोक झाला होता. पण आता माझ्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होता आहे.
याविषयी सुरेखा यांनी पुढे सांगितले होते की, बधाई हो हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच मला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर मला अर्धांगवायूचा झटका देखील आला. या सगळ्यामुळे मला जेवणच जात नव्हते. यामुळे माझे वजन देखील खूपच कमी झाले. माझे संपूर्ण कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून माझी काळजी घेत असून मी लवकरच पूर्णपणे बरी होईल याची मला खात्री आहे.
सुरेखा सिक्री यांनी झोया अख्तरची एक शॉर्ट फिल्म साईन केली असून त्या लवकरच यासाठी चित्रीकरण करायला देखील सुरुवात करणार आहे. सुरेखा सिक्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.