Lata Mangeshkar: हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर...थक्क करणारा होता दीदींचा सांगीतिक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 09:56 AM2022-02-06T09:56:53+5:302022-02-06T09:58:52+5:30

Lata Mangeshkar: दीदींचं खरं नाव हेमा होतं, परंतु जन्मांनंतर ५ वर्षांनी दीदींचं नाव लता ठेवलं गेलं.

bharat ratna lata mangeshkar passed away her musical journey | Lata Mangeshkar: हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर...थक्क करणारा होता दीदींचा सांगीतिक प्रवास

Lata Mangeshkar: हेमा ते भारतरत्न लता मंगेशकर...थक्क करणारा होता दीदींचा सांगीतिक प्रवास

googlenewsNext

भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झालेलं आहे. लता दीदींचा  जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर या परिवारात झाला होता. दीदींचे वडिल, दीनानाथ मंगेशकर हे एक रंगमंच कलाकार आणि गायक होते. त्यामुळे संगीत हे दीदींना वारशातचं मिळाले होते. खूप कमी लोकांना माहीत असेल की दीदींचं खरं नाव हेमा होतं, परंतु जन्मांनंतर ५ वर्षांनी दीदींचं नाव लता ठेवलं गेलं. लतादीदी सर्व भावंडांमध्ये मोठ्या होत्या.आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही लहान भावंडं.

लतादीदींनी वयाच्या ५व्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या मराठी संगीत नाटकांत काम करावयास सुरवात केली होती. १९४२मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी दीदी केवळ १३ वर्षांच्या होत्या. नवयुग चित्रपट कंपनी मालक आणि दीदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी मंगेशकर कुटुंबाची मदत केली आणि दीदींना एक गायक आणि अभिनेत्री होण्यास हातभार लावला होता.

लतादीदींची संगीत सफर मराठी चित्रपटांपासून झाली. किती हसाल (१९४२) या मराठी चित्रपटात दीदींनी ‘नाचुं या गडे, खेळू सारी, मनी हौस भारी; हे गाणं गायले होते, परंतु दुर्दैवाने हे गाणं चित्रपटातून गाळण्यात आलं होतं. १९४५ साली मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात राहावयास आले.
 
उस्ताद अमानत अली खाँ यांच्याकडून दीदी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या होत्या. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खाँ यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केलं. तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवालेंकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही दीदींना तालीम मिळाली होती. त्यांनी मास्टर विनायक यांच्या हिंदी चित्रपटांमध्ये छोटे रोल करता करता हिंदी गाणी आणि भजने गायली होती.

त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) या हिन्दी चित्रपटामध्ये दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणं गायलं.१९४८ साली मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केलं. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा’ हे गाणं म्हणण्याची संधी दिली होती. १९४९ साली ‘महल; चित्रपटामधील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे दीदींच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारं ठरलं.
 
लतादीदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळालं. १९६० मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ हे मुगल-ए-आजम (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेलं आणि मधुबालावर चित्रीत गाणं तुफान लोकप्रिय झालं. ‘बीस साल बाद; (१९६२) या चित्रपटातील ‘कहीं दीप जले कहीं दिल‘ या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी त्यांना दुसरं फिल्मफेअर पुरस्कार मिळालं.
 
लतादीदींनी नौशाद साहेबांकरिता विविध रागांवर आधारित गाणीही गायली आहेत. १९६१ साली दीदींनी लोकप्रिय भजन ‘अल्लाह तेरो नाम’आणि ‘प्रभु तेरो नाम’ अशी भजनं गायली तर १९६३ मध्ये ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्तपर अमर गीत गाऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. दीदींनी मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीतं गायिली आहेत.
 
अलिकडच्या काळात आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतिन-ललित, दिलीप-समीर सेन, उत्तम सिंह, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव तथा ए आर रहमान यांच्याबरोबरही काम केले होतं. जगजीत सिंह, एस पी बालसुब्रमण्यम, उदित नारायण, हरिहरन, कुमार शानू, सुरेश वाडकर, मो. अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूपकुमार राठौड़, विनोद राठौड़, गुरदास मान तथा सोनू निगम यांच्याबरोबर युगलगीतेंही गायली आहेत.

Web Title: bharat ratna lata mangeshkar passed away her musical journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.