"नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी, सुशांतसिंगसारखे झाले असते", प्रियांका चोप्राला सेलिब्रिटींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 10:28 AM2023-03-29T10:28:23+5:302023-03-29T10:29:26+5:30

अनेक हिट सिनेमे देणाऱ्या प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं.

celebrities come in support of priyanka chopra over remark on politics in bollywood | "नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी, सुशांतसिंगसारखे झाले असते", प्रियांका चोप्राला सेलिब्रिटींचा पाठिंबा

"नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी, सुशांतसिंगसारखे झाले असते", प्रियांका चोप्राला सेलिब्रिटींचा पाठिंबा

googlenewsNext

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) नुकताच बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला. बॉलिवूडमधीलराजकारणाला कंटाळून आणि मिळत असलेल्या वाईट वागणूकीमुळेच हॉलिवूडला गेल्याचं तिने सांगितलं. यामुळे आता सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ माजली आहे. प्रियांकाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत.

'ऐतराज', 'डॉन 2', 'गुंडे', 'अग्निपथ २', '७ खून माफ' यांसारखे अनेक हिट सिनेमे देणाऱ्या प्रियांका चोप्राला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. तिला चित्रपटाच्या ऑफर येणं कमी झालं होतं. म्हणूनच तिने हॉलिवूडमध्ये असलेली गाण्याची संधी स्वीकारली आणि ती कायमची अमेरिकेला गेली. प्रियांकाच्या या गौप्यस्फोटावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नंतर आता 'काश्मीर फाईल्स' फेम दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री (Atul Agnihotri) आणि फिल्ममेकर अपूर्व असरानी (Apurv Asarani) यांनी  नुकतंच या प्रकरणावर ट्वीट केलं आहे.

'बुली गँग ला हरवणं अशक्य'

विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूड माफिया आणि कँप विरोधात आवाज उठवला. प्रियांकाला पाठिंबा देत त्यांनी ट्वीट केले की, 'जेव्हा इंड्स्ट्रीत मोठे लोक बुली करतात म्हणजेच चिथवतात, त्यांची दबंगगिरीपुढे अनेक जण गुडघे टेकवतात. काही जण शरणागती पत्करतात. काही हिंमत हारतात. तर काही जण ड्रग्सच्या आहारी जातात आणि आत्महत्येचं पाऊल उचलतात. बुली करणाऱ्या गँगला हरवणं अशक्य आहे. खूप कमी असे असतात जे यातून यश मिळवतात. तेच खऱ्या आयुष्यातील स्टार असतात.'

याशिवाय फिल्ममेकर अपूर्व असरानी यांनी ट्वीट करत लिहिले, 'अखेर प्रियांकाने आज तो खुलासा केला ज्याबद्दल सर्वांनात माहित होतं मात्र कोणी कधीच तोंडातून ब्र देखील काढला नाही. ना उदारवादी लोकांनी आणि नाही फेमिनिस्ट लोकांनी. ते अशा लोकांचा जयजयकार करतात ज्यांनी प्रियांकाला वाळीत टाकलं. प्रियांकाचे हॉलिवूडला जाणे हे तिचे मोठे यश आहे.नाहीतर तिचेही हाल परवीन बाबी किंवा सुशांतसिंग राजपूत सारखे झाले असते.'

गायक अमाल मलिक तर या ग्रुपिझम वर भलताच भडकला आहे. अनेक ट्वीट करत त्याने बॉलिवूडची पोलखोल केली आहे. इथे काही गायक चाटूगिरी करत काम मिळवतात ते मी कधीच करणार नाही आणि म्हणून आज माझ्याकडे काम नाही असे त्याने ट्वीटमध्ये लिहिले. तसंच प्रियांकाला पाठिंबा देत तो म्हणाला, 'आता माझ्या चाहत्यांना कळत असेल की मी बॉलिवूड फिल्म फारशा का करत नाही.'

सध्या प्रियांकाच्या या गौप्यस्फोटामुळे वादाला तोंड फुटले आहे. प्रियांका अमेरिकेत असून तिचा लीड रोल असलेला हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये आलिया, कॅटरिना यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Web Title: celebrities come in support of priyanka chopra over remark on politics in bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.