प्रेमासाठी अख्ख्या जगाशी लढली अन् अचानक शांत झाली... वाचा, स्मिताची लव्हस्टोरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 08:00 AM2020-12-13T08:00:00+5:302020-12-13T09:55:42+5:30
13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता यांनी अवघ्या 31व्या वर्षी जगाचा निरोप घेतला...
आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर ठसा उमटवणा-या अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी. 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या केवळ 31 व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. मोहक रूप आणि निखळ हास्याची एक अभिनेत्री कायमची हरवली, पण तिच्या आठवणी मात्र आजही कायम आहेत.
1970 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांना उपजत अभिनयाची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. अखेर 1974 साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. स्मिता यांचे सिनेमे गाजलेत तसेच त्यांचे खासगी आयुष्यही गाजले. स्मिता राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या आणि या प्रेमासाठी अख्ख्या जगाशी लढल्या.
राज बब्बर आधी विवाहित होते. त्यांना दोन मुलं होती. याच कारणामुळे स्मिता यांच्या घरातून राज व स्मिताच्या नात्याला कडाडून विरोध झाला. पण स्मिता या विरोधाला जुमानणा-या नव्हत्या...
राज बब्बर व स्मिता यांची पहिली भेट 1982 साली आलेल्या ‘भीगी पलकें’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघेही या सिनेमात लीड भूमिकेत होती. ही पहिली भेट फार काही खास नव्हती. ओरिसाच्या राऊलकेला येथे शूटींग होते. या सेटवर राज बब्बर व स्मिता पहिल्यांदा एकमेकांना भेटले. आधी दोघांमध्ये खूप हास्यविनोद रंगले आणि अचानक कुठल्याशा कारणावरून वादही झाला. पण स्मिताच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द राज बब्बर यांच्या काळजात घर करून बसला होता. ते तेव्हाच स्मितावर फिदा झाले होते. या भावना स्मितापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही आणि हळूहळू दोघांमध्येही प्रेम बहरू लागले.
राज व स्मिता सेटवर तासन् तास एकत्र वेळ घालवत. सेटबाहेरही एकमेकांना भेटत. अशात प्रेम लपून राहणार कसे? फिल्मी मॅगझिनमध्ये दोघांच्याही अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आणि यानंतर राज यांच्या पत्नी नादिरा यांच्यापर्यंतही दोघांच्या अफेअरची चर्चा पोहोचली. आधी तर नादिरा यांना विश्वास बसला नाही. पण चैन पडेना. अखेर तिने राज यांना थेट विचारणेच योग्य समजले. राज यांनीही काहीही न लपवता, पत्नीसमोर प्रेमाची कबुली दिली. मी स्मितावर प्रेम करतो आणि लग्न करू इच्छितो, असे त्यांनी थेट सांगून टाकले. नादिरासाठी हा मोठा धक्का होता. तिने राज यांना सोडले नाही पण त्यांच्या मार्गातून वेगळी झाली. नादिरा राज यांच्या आयुष्यातून गेल्यानंतर स्मिताने राज यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय तडीस नेणे सोपे नव्हते.
राज विवाहित होते, दोन मुलांचे बाप होते. त्यामुळे स्मिताच्या कुटुंबीयांना या लग्नाला कडाडून विरोध केला. लोकांनीही स्मिता व राज यांच्या नात्याला गैर ठरवले. नादिराचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप स्मितावर केला गेला. पण स्मितावर याचा काहीही परिणाम झाला नाही. आपल्या निर्णयावर ती ठाम होती. अखेर स्मिता व राज यांचे लग्न झाले.
आईचे एक न ऐकता स्मिताने राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने टीका करण्यास सुरुवात केली. स्मिताला ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आले. या टीकेने स्मिता आतून खचली होती. इतकी की, तिच्या संवेदनशील मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणारी स्मिता लग्नानंतर अचानक शांत झाली होती. अनेकदा राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. अर्थात स्मिताने असे काही केले नाही. पण नियतीने मात्र हा विचार नेमका अमलात आणला. 13 डिसेंबर 1986 रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या सहा तासांत स्मिताने जगाचा निरोप घेतला. राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिताने कायमची एक्झिट घेतली.