India Lockdown Movie Review : पास की फेल ? जाणून घ्या कसा आहे सई ताम्हणकर, प्रतीक बब्बरचा 'इंडिया लॉकडाउन'
By संजय घावरे | Published: December 2, 2022 04:05 PM2022-12-02T16:05:33+5:302022-12-02T16:06:25+5:30
India Lockdown Movie Review: जाणून घ्या कसा आहे, मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडिया लॉकडाउन चित्रपट
कलाकार : प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर, कविता अमरजीत, सानंद वर्मा, प्रकाश बेलवडी, आहना कुमरा, श्वेता बासू प्रसाद, गोपाल सिंग
दिग्दर्शक : मधुर भांडारकर
निर्माते : जयंतीलाल गडा, मधुर भांडारकर, प्रणव जैन
कालावधी : दोन तास ३३ मिनिटं
स्टार - अडीच स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे
खूप क्रूर होते कोरोना काळातील लॅाकडाउनचे 'ते' दिवस... रस्त्यावर भयाण शांतता, रुग्णांनी खच्चून भरलेली रुग्णालयं, स्मशानात मृतदेहांच्या रांगा, ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा तुटवडा, काळजाचा ठोका चुकवणारे रुग्णावाहिकांचे आवाज, चिंता वाढवणाऱ्या टीव्हीवरील बातम्या आणि त्यातून जगण्यासाठी सुरू असलेली श्रीमंतांपासून गरीबापर्यंत सर्वांची धडपड हे सर्वांनी लॅाकडाऊनमध्ये अनुभवलं. दिग्दर्शक मधुर भांडारकरांच्या या चित्रपटात जगण्याचा संघर्ष पहायला मिळतो, पण कोरोना काळातील दाहकता जाणवत नाही.
कथानक : यात हाय क्लास पायलट, ज्येष्ठ उच्च मध्यमवर्गीय, पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि मजूर अशा चार वर्गांतील व्यक्तिरेखांच्या कथा आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाची झालेली अवस्था आणि जगण्यासाठीची धडपड आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची अवस्था काय झाली असेल याचं चित्र मेहरुनीस्सानं रेखाटलं आहे. माधव आणि फूलमती यांनी मजूरांची व्यथा मांडली आहे. पायलट मून अॅल्वेसनं उच्चभ्रू वर्गतील व्यक्तींच्या गरजा सादर केल्या आहेत. कोरोना काळात एकट्या पडलेल्या ज्येष्ठांची परिस्थिती नागेश्वर रावच्या रूपात पहायला मिळते. लॉकडाऊनमुळं सर्वांचीच कशी दाणादाण उडाली ते यात आहे.
लेखन-दिग्दर्शन : निवडलेला विषय प्रत्येकाच्या मनाला भिडणारा असला तरी त्या काळातील दाहकता न दाखवल्यानं हा चित्रपट केवळ चौघांच्या स्टोरी सांगतो. आरोग्य व्यवस्थेची दैना, कायदा आणि सुव्यवस्थेचा बडगा, नोकरी-धंद्यांची दुरावस्था, मानवाच्या अनुपस्थितीत पशू-पक्ष्यांचा मुक्त संचार, आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी स्वार्थी बनलेला मानव, ई-पासमधील घोटाळे, जीवावर उदार होऊन सेवा देणारे कोरोना योद्धे, डॅाक्टर-पोलीसांच्या कुटुंबांची मनोवस्था, क्वारंटाईनमधील कुटुंबांची स्थिती आणि सवगृहीच कैद झालेल्यांचे हाल यातील काहीच चित्रपटात नाही. मजूरांनी आपल्या गावी जाण्यासाठी केलेला पायी प्रवास चित्रपटात दाखवला इतका सोपा मुळीच नव्हता. देहिक्रय करणाऱ्या स्त्रियांची अवस्थाही दयनीय वाटत नाही. ज्येष्ठांच्या व्यथाही वरकरणी मांडल्या आहेत. मिलनासाठी आतुरलेल्या जोडप्याऐवजी कोरोना योद्ध्यांच्या घरातील वातावरण अपेक्षित होतं. दिग्दर्शक म्हणून भांडारकर यांनी कदाचित एका वेगळ्या दृष्टिकोनातून लॅाकडाऊनकडे पाहिले असेल, पण जे आवश्यक होते ते मिसींग वाटते आणि जे दाखवलं तेही तितके मनावर ठसत नाही. कॅास्च्युम, मेकअप, गेटअपवर चांगलं काम केले आहे. कॅमेरावर्क आणि संकलन सामान्य आहे.
अभिनय : सई ताम्हणकरनं फुलमतीची व्यक्तिरेखा चांगली वठवली आहे. बोलीभाषेच्या लहेजाकडे आणखी लक्ष द्यायला हवं होतं. प्रतीक बब्बरनं आपल्या कॅरेक्टरचा ग्राफ उत्तमरीत्या सादर केला आहे. श्वेता बासू प्रसादनं बोल्ड व्यक्तिरेखाही सहजपणे साकारली आहे. प्रकाश बेलवडी यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. आहना कुमरानं वरच्या क्लासमधील लोकांचं प्रतिनिधीत्व छान केलं आहे. सानंद वर्मानं रंगवलेला दलालही चांगला झाला आहे. गोपाल सिंगनं साकारलेल्या छोट्याशा भूमिकेत कठीण प्रसंगांमध्येही मानवाच्या मनातील राक्षसाची झलक पहायला मिळते.
सकारात्मक बाजू : अभिनय, कॅास्च्युम, मेकअप, गेटअप
नकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, कॅमेरावर्क, संकलन
थोडक्यात : लॅाकडाऊनच्या काळातील कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटात वास्तवातील दाहकता अजिबात नसल्यानं मोकळा वेळ असेल तर पहायला हरकत नाही.