'मी मराठी नायक असल्याने..'; 'मैंने प्यार किया'च्या सेटवर लक्ष्मीकांत यांना टाळायचा सलमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 12:36 PM2023-07-16T12:36:41+5:302023-07-16T12:37:15+5:30
Lakshmikant berde: मराठी सिनेसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, असं असूनही 'मैंने प्यार किया'च्या सेटवर सलमान त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हता.
दमदार अभिनयशैली, विनोदकौशल्य, अभिनयातील सहजसुंदरपणा यांच्या जोरावर सिनेसृष्टी गाजवलेला अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). मराठीसह बॉलिवूडमध्येही लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. यात साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे 'मैंने प्यार किया' या सिनेमातील त्यांची भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या सिनेमातसलमान खान (salman khan) मुख्य भूमिकेत होता. तर, लक्ष्मीकांत यांनी सहकलाकाराची भूमिका साकारली होती. परंतु, लक्ष्मीकांत यांच्या एका गोष्टीमुळे सिनेमाच्या सेटवर कित्येक काळ सलमान त्यांच्याशी बोलत नव्हता. खूप वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 'मैंने प्यार किया'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी मराठी सिनेसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. मात्र, असं असूनही मैंने प्यार कियाच्या सेटवर सलमान त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हता. लक्ष्मीकांत आले की सलमान तेथून पळ काढायचा.
"मी मराठी कलाविश्वातील नायक असल्यामुळे आणि मराठी सिनेसृष्टीत माझं नाव चांगलं असल्यामुळे अनेक मराठी कलाकार मला थोडं घाबरुन असायचे. त्यामुळे मैंने प्यार कियाच्या सेटवर सलमान माझ्यापासून लांब पळायचा. लक्ष्मीकांतपासून लांब रहा असं त्याला कोणी तरी सांगितलं होतं. तो आयत्यावेळी अॅडिशन करतो, असंही त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सुरुवातीला तो माझ्याशी बोलत नव्हता", असं लक्ष्मीकांत म्हणाले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने भावुक झाला सलमान खान, या चित्रपटांच्या यशाचे श्रेय दिलं त्यांना
पुढे ते म्हणतात, "शेवटी एकदा मी त्याला विचारलंच की तू माझ्यापासून लांब का पळतोस? जोपर्यंत आपलं ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सीन चांगले होणार नाहीत. भाग्यश्री तर मराठीच होती. ती माझी चाहती असल्यामुळे आमचं छान जुळून आलं होतं.पण, सलमानसोबत जुळून यायला थोडा वेळ लागला."
दरम्यान, या सिनेमामध्ये सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह भाग्यश्री, रिमा लागू, मोहनीश बहल, राजीव वर्मा यांसारख्या कलाकारांनी काम केलं होतं.