मंदिरा बेदीनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 08:00 PM2019-09-08T20:00:00+5:302019-09-08T20:00:00+5:30
‘किसका होगा थिंकीस्तान सीझन टू’च्या निमित्ताने अभिनेत्री मंदिरा बेदी हिने सिनेइंडस्ट्रीतील काही गोष्टीबद्दल खुलासा केला आहे.
कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारी एखादी स्त्री बढतीसाठी पात्र असताना ती बढती तिचा एखादा पुरुष सहकारी घेऊन जातो हा प्रकार घडल्याचे तुम्ही किती वेळा ऐकले आहे? किंवा एखाद्या स्त्रीला ड्रायव्हर किंवा मेकॅनिक म्हणून तिची उपजीविका कमावण्याची इच्छा आहे पण आपला पुरुषप्रधान समाज तिला हे काम देत नाही, हे कितीवेळा बघितले आहे? जेव्हा स्त्रीला मोबदला देण्याची वेळ येते तेव्हा पुरुषाच्या तुलनेत तिला कमी मोबदला दिला जातो हे तर बॉलिवूडनेही मान्य केले आहे. एम एक्स प्लेअर्सचे ‘किसका होगा थिंकीस्तान सीझन टू’मध्ये ऑफिसमधील राजकारण, व्यावसायिक शत्रुत्व आणि कामाच्या ठिकाणी होणारा लिंगभेद या विषयांवरील ज्वलंत नाट्य घेऊन येत आहे. या एमएक्स ओरिजिनल मालिकेत मंदिरा बेदी एका आदर्श बॉसची भूमिका करत आहे.
मंदिराची व्यक्तिरेखा स्वभावाने जेवढी धाडसी आहे, तेवढीच नम्रही आहे. ही व्यक्तिरेखा कोणालाही रोल मॉडेल वाटावी अशी आहे. वास्तवात असो किंवा रूपेरी पडद्यावर कामाच्या ठिकाणी लिंगभेद आजही सर्रास आढळत असल्याच्या गोष्टीशी मंदिरा बेदी सहमत आहे.
ती या विषयावर खुलेपणाने व्यक्त होत म्हणाली, “आजही कामाच्या ठिकाणी असमानता बघायला मिळते. कामाच्या ठिकाणी लिंगभेद आजही अस्तित्वात आहे. तरीही आजच्या स्त्रिया याविरोधात लढा देत आहेत आणि कितीही अडथळे असोत त्यातून मार्ग काढत यश मिळवत आहेत हे बघून आशावादी वाटते.
तिने पुढे सांगितलं की, या मालिकेत मी एका बॉसची भूमिका करत आहे. ती मेहनती आहे, नीतीमूल्ये जपणारी आहे आणि धाडसीही आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन कसे द्यायचे, त्यांच्या कामाचे कौतुक कसे करायचे आणि त्याचवेळी त्यांच्या कामावर विधायकपणे प्रतिक्रिया कशा द्यायच्या हे तिला माहीत आहे. मला वाटते की, माझी भूमिका बघून एका स्त्रीला जरी प्रेरणा मिळाली, तरी ही मालिका तयार करण्याचे काम आम्ही सर्वांनी चांगले केले आहे असे समजायला हरकत नाही.”
‘किसका होगा थिंकिस्तान सीझन टू’चं दिग्दर्शन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एन. पद्मकुमार यांनी केलं आहे. कामाच्या ठिकाणी लिंगानुसार निर्माण झालेल्या साचेबद्ध कल्पना, व्यक्ती-व्यक्तींमधील संघर्ष, मैत्री, फसवणूक आणि विवाहबाह्य संबंध या सगळ्या विषयांना या मालिकेने स्पर्श केला आहे.
‘किसका होगा थिंकिस्तान-सीझन टू’ एमएक्स प्लेअर स्ट्रीमवर पहायला मिळेल.