'मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने घेतली स्टेटमेंटवर स्वाक्षरी', सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांचा धक्कादायक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 02:33 PM2020-09-03T14:33:08+5:302020-09-03T14:34:39+5:30
सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांनी मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन एजेंसी तपास करत आहेत. दररोज या प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. या दरम्यान सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांनी मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत त्याच्या कुटुंबातील आणि इतर अनेक व्यक्तींनी, सेलिब्रिटींनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. काहींना समन्स देखील पाठवण्यात आले आहे.
टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार एका पत्रकार परिषदेत सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग म्हणाले की, 'कुटुंबाने असे कधी स्टेटमेंट दिले नव्हते की सुशांतने आत्महत्या केली आहे. हे स्टेटमेंट मुंबई पोलिसांनी मराठीमध्ये रेकॉर्ड केले होते. मराठीमध्ये लिहिण्याबाबत त्याच्या कुटुंबाने असे देखील म्हटले होते की तुम्ही आमची स्वाक्षरी घेणार आहात तर कृपया मराठीत लिहू नका. त्यांच्याकडून जबरदस्तीने मराठी स्टेटमेंटवर स्वाक्षरी घेण्यात आली. त्यांना माहित नव्हते त्यात काय लिहिले आहे.'
इतकेच नाही तर विकास सिंग यांनी सांगितले की, हे स्टेटमेंट सुशांत सिंग राजपूत यांच्या कुटुंबियांना वाचून नाही दाखवले गेले. जरी मराठीमध्ये वाचले असते तरी समोरच्याला मराठी येत नाही, त्यामुळे तेच सांगणार, जे समोरच्याला ऐकायचे आहे. ते कसे तपासून पाहतील की काय लिहिले आहे. हे एक सिंपल लॉजिक आहे.'
तर सुशांतचे कुटुंब करणार कायदेशीर कारवाई
सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला. कोणताही निर्माता वा दिग्दर्शक सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार नाही किंवा त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकणार नाही. असे झाल्यास सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते. सुशांत वा त्याच्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती देणा-या मीडिया हाऊसविरोधातही सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते.