Sushant Singh Rajput Suicide : सुशांतने ‘छिछोरे’मध्ये आत्महत्या न करण्याचा संदेश दिला अन् स्वत:च आत्महत्या केली...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:02 PM2020-06-14T16:02:58+5:302020-06-14T16:06:07+5:30
सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता असे म्हटले जातेय. पण तरीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल? यावर अद्यापही विश्वास ठेवणे कठीण जातेय.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि चाहते सुन्न झालेत. टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा सुशांतने आत्महत्या का करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता असे म्हटले जातेय. पण तरीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल? यावर अद्यापही विश्वास ठेवणे कठीण जातेय. काही महिन्यांपूर्वी सुशांतचा ‘छिछोरे’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात आत्महत्या करणे आयुष्यावरचा तोडगा नाही, असा संदेश सुशांतने दिला होता. आत्महत्या न करण्याचा संदेश देणा-या याच सुशांतने आज आत्महत्या करत जीवन संपवले, हा एक दुर्दैवी योगायोग म्हणावा.
सात मित्रांच्या कॉलेज लाईफवर आधारित ‘छिछोरे’ या सिनेमात सुशांतने अनिरूद्ध उर्फ अन्नीची भूमिका साकारली होती. कॉलेजात या सातही मित्रांना लुजर्स ठरवण्यात आले असते. पण हे सातही मित्र जिद्दीने लुजर्सचा हा टॅग हटवतात, असे या चित्रपटाचे ढोबळ कथानक होते. अन्नीचा मुलगा आत्महत्येचा प्रयत्न करतो तेव्हा अन्नी आपल्या सात मित्रांच्या मदतीने पुन्हा एकदा आपल्या कॉलेज लाईफमधील आठवणी ताज्या करत, आपल्या मुलात जगण्याची नवी उमेद जागवतो. मुलाला मृत्यूच्या दाढेतून परत आणतो.
आयुष्यात कितीही संकटे आलीत, कितीही अपयश आले तरी खचून न जाता त्याचा धीराने आणि चिकाटीने सामना करायचा, हा संदेश या चित्रपटातून देण्यात आला होता. सुशांत सिंगने लोकांना हा संदेश दिला खरा. पण स्वत: मात्र त्याने हा संदेश अमलात आणला नाही, असेच म्हणावे लागेल.