Prabhu deva Birthday Special : प्रभू देवाने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज कमवतोय करोडोने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:57 AM2019-04-03T11:57:03+5:302019-04-03T11:57:50+5:30
प्रभू देवाचे वडील कोरिओग्राफर असले तरी त्याने त्यांची मदत कधीच घेतली नाही. करियरच्या सुरुवातीला अतिशय छोट्या भूमिकांमध्ये देखील तो झळकला.
प्रभूदेवाचा आज म्हणजेच ३ एप्रिलला वाढदिवस असून एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. प्रभू देवाचा जन्म हा कर्नाटकमधील मैसूर येथील आहे. त्याचे वडील मुगूर सुंदर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. त्याने त्यांच्याकडूनच लहानपणापासून नृत्याचे धडे गिरवले.
प्रभू देवाचे वडील कोरिओग्राफर असले तरी त्याने त्यांची मदत कधीच घेतली नाही. करियरच्या सुरुवातीला अतिशय छोट्या भूमिकांमध्ये देखील तो झळकला. मौना रगम या चित्रपटाद्वारे त्याने या क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात केवळ एका गाण्यात काही क्षणांसाठी बासरी वाजवताना तो दिसला होता. त्यानंतर अग्नी नातचथिरम या चित्रपटात तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला. कमल हासनच्या वेत्री विझ्हा या चित्रपटात त्याला पहिल्यांदा डान्स कोरिग्राफ करण्याची संधी मिळाली. कोरिग्राफी करत असतानाच तो अभिनयक्षेत्राकडे वळला.
प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याची डान्स अॅकेडमी आहे. ही अॅकेडमी त्याने २००९ मध्ये सुरू केली असून ती सिंगापूर येथे आहे. सलमानच्या वाँटेड या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले आहे. विशेष म्हणजे हा प्रभू देवाने दिग्दर्शित केलेला पहिला बॉलिवूडचा चित्रपट होता. याचसोबत प्रभूदेवाने राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
प्रभुदेवाचे पहिले लग्न लता सोबत झाले. त्या दोघांना तीन मुले असून त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचे निधन 2008 मध्ये कॅन्सरने झाले. त्यानंतर दोनच वर्षांत प्रभू देवा आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. प्रभूने नयनतारासोबत लग्न केल्यास मी अन्नाचा त्याग करेन असे लताने म्हटले होते. तिने या प्रकरणात काही महिला संघटनांची देखील मदत घेतली होती. त्यानंतर काहीच महिन्यात प्रभू देवा आणि माझे नाते तुटले असल्याचे नयनताराने कबूल केले. या सगळ्या प्रकरणामुळे प्रभू देवाचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले.