सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, नेमकं कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:08 PM2022-05-31T22:08:02+5:302022-05-31T22:08:27+5:30
पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण पंजाब हादरलं आहे.
मुंबई
पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणानं संपूर्ण पंजाब हादरलं आहे. सिद्धू मुसेवाला याच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आहे आणि आता त्याचंच नाव या खून प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून उदयास आलं आहे. यादरम्यान आता बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचीही सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचं मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यानंतर सलमान खानची वैयक्तिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत यास पुष्टी दिली आहे. "आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही टोळी किंवा गुंडांकडून कोणतीही वाईट कृत्यं होणार नाहीत याची खात्री आम्ही घेत आहोत. सलमानच्या अपार्टमेंटभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे", असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
'सलमान खानला मारणार...', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पोलीस कोठडीत दिली धमकी; व्हिडिओ व्हायरल
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा प्लान गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराच यांनी केला होता. २९ मे रोजी सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्धूच्या हत्येमुळे पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. याआधीही अनेकदा तो चर्चेत आला होता. त्याची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली होती जेव्हा त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग...
२०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने तुरूंगातूनच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचं कारण होतं सलमान खानचं काळविट शिकार प्रकरण. कारण गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळेच त्याने सलमान खानला काळविट शिकार प्रकरणावरुन थेट जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. सलमान खानला जीवे मारण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्लानिंग केलं होतं. 'रेडी' सिनेमाच्या शूटिंगवेळी लॉरेन्सने सलमान खानवर हल्ला करण्याचं प्लानिंग केलं होतं. पण त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला त्याच्या आवडीचं शस्त्र मिळालं नव्हतं. त्यामुळे हत्येचं प्लानिंग पूर्ण होऊ शकलं नव्हतं.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक; उत्तराखंडमधून मनप्रीत सिंगला ठोकल्या बेड्या
बिश्नोईचा जवळचा सहकारी राहुल याला पोलिसांनी २०२० मध्ये हत्येप्रकरणी अटक केली होती. त्यावेळी सलमान खानच्या हत्येची योजना आखल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. प्लॅन तयार करण्यासाठी आणि त्यासाठी पुन्हा काम करण्यासाठी तो मुंबईलाही गेला होता. लॉरेन्स बिश्नोई दिल्लीच्या तिहार तुरूंगात कैदेत आहे आणि तो तिथूनच त्याची गॅंग ऑपरेट करतो. त्याच्या गॅंगमध्ये ७०० लोक आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्रुप सुपारी घेणे आणि हत्या करण्याची कामं करतात. त्यानंतर फेसबुकवरून गुन्ह्याची जबाबदारी घेतात. या गॅंगचं नेटवर्क देशभरात पसरलं आहे.