कॅन्सरशी झुंज देत असलेला संजय दत्त कामावर परतणार, घेतला हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:30 PM2020-09-07T14:30:57+5:302020-09-07T14:32:04+5:30
संजयच्या फुफ्फुसांमध्ये वेगाने फ्लूएड जमा होत आहे आणि त्याचे प्रमाण वाढत आहे़.
संजय दत्त सध्या फुफ्फुसाच्या कॅन्सरशी लढत आहे. संजयचा कॅन्सर चौथ्या स्टेजला पोहोचला आहे. संजयला पुढच्या उपचारासाठी अमेरिकेला जायचे होते. पण आता कदाचित या योजनेत बदल झाल्याचे दिसतेस. आता संजयवर मुंबईतच उपचार होणार आहेत. संजयच्या फुफ्फुसांमध्ये वेगाने फ्लूएड जमा होत आहे आणि त्याचे प्रमाण वाढत चालले आहे़. उपचाराचा एक टप्पा पूर्ण झाला असून आता किमोथेरपीची सुरुवात झाली आहे.
येत्या10 तारखेपासून संजयच्या उपचाराचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. हा उपचार कितीकाळ चालेल, किती टप्प्यात होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ताज्या माहितीनुसार, लीलावतीच्या डॉक्टरांनी संजयच्या फुफ्फुसातून जवळपास 1.5 लीटर फ्लूएड काढले. आता त्याच्यावर कोकिळाबेन रूग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरु आहेत.
तरीही करणार शूटींग
कॅन्सरचे निदान होण्यापूर्वी संजयने अनेक सिनेमे साईन केले होते. आता उपचारादरम्यान हे रखडलेले सिनेमे पूर्ण करण्याचा निर्णय संजयने घेतला आहे. संजयच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच तो ‘शमशेरा’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण करणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाशिवाय केजीएफ- चॅप्टर 2, पृथ्वीराज, भुज- द प्राईड आॅफ इंडिया, तोरबाज असे सिनेमे आहेत. यापैकी काही सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले आहे तर काहींचे थोडे बाकी आहे.
मुलांच्या काळजीने चिंतीत
कॅन्सरशी झुंज देणारा संजय दत्तने आजाराला स्वीकारले आहे. तो सकारात्मकरित्या आजाराचा सामना करतोय. सुरूवातीला मुलांच्या काळजीने तो चिंतीत होता. आपले काही बरेवाईट झाले तर 10 वर्षांच्या जुळ्या मुलांचे काय होणार, ही चिंता त्याला होती. त्यामुळेच रिपोर्टसमोर आला तेव्हा त्याला धक्का बसला होता, मात्र काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला आहे.