16 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा हा सुपरस्टार, पत्नीनेच दिला दगा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 08:00 AM2019-08-25T08:00:00+5:302019-08-25T08:00:02+5:30
80 च्या दशकापर्यंत मोठा पडदा गाजवणारा हा अभिनेता अचानक अंधारात गुडूप झाला. तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही कुणी घेतली नाही.
बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘अर्थ’ कोण विसरू शकेल? ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...’ हे गाणे आठवले की ‘अर्थ’ हा सिनेमा हमखास आठवतो. पाठोपाठ आठवतात ते शबाना आझमी आणि अभिनेता राज किरण. 80 च्या दशकापर्यंत मोठा पडदा गाजवणारा हा अभिनेता अचानक अंधारात गुडूप झाला. तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही कुणी घेतली नाही. दशकभरानंतर काहींना जाग आली. यानंतर अनेकांनी राज किरणचा शोध सुरु केला. या काळात कधी त्याच्या मृत्यूची अफवा उडाली. काहींनी तो मनोरूग्णालयात असल्याचे म्हटले तर काहींनी तो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवताना दिसल्याचा दावा केलाा. पण राज किरण कधीच परतला नाही.
‘कर्ज’मध्ये राज किरणसोबत काम करणारे ऋषी कपूर यांनीही त्याला शोधण्याचे प्रयत्न केलेत. 2011 मध्ये ऋषी कपूर राज किरणचा भाऊ गोविंद मेहतानी याला भेटले होते. राज किरण गत दहा वर्षांपासून अमेरिकेत अटलांटाच्या एका मनोरूग्णालयात असल्याची माहिती गोविंद यांनी ऋषी कपूर यांना दिली होते. भावाने दिलेल्या माहितीनुसार, राज किरणला पत्नीने धोका दिला. हा आघात राज किरणला सोसवला नाही आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. पुढे त्याचे मानसिक संतुलन ढासळले. अर्थात राज किरणची पत्नी रूपाने हा दावा फेटाळून लावला होता.
काहींच्या मते, चित्रपटांमध्ये काम करणे कमी केल्यानंतर राज किरणची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. डिप्रेशनवर उपचार घेताघेता त्याच्याजवळचे सगळे पैसे संपले होते. राज किरणची तब्येत खालावत असताना त्याची पत्नी रुपा मेहतानी आणि मुलगी ऋषिकाने त्याची साथ सोडली होती.
अभिनेत्री दिप्ती नवल यांनीने राजसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी दीप्ती यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित राज किरणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. राज किरण हा अभिनेता सध्या न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत असल्याचे मी काही लोकांकडून ऐकले आहे. कोणालाही त्याच्याविषयी काहीही माहिती असेल तर माझ्याशी त्वरित संपर्क साधावा, असे दीप्ती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
1994 मध्ये राज किरण ‘रिपोर्टर’ या शेखर सुमनच्या मालिकेत अखेरचा दिसला होता.