सॉरी, लोकांनी तुला खूप त्रास दिला...; सोशल मीडिया युजर्स का मागत आहेत रिया चक्रवर्तीची माफी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 08:00 AM2021-03-10T08:00:00+5:302021-03-10T08:00:02+5:30
तब्बल सहा महिन्यानंतर रिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेली पाहून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. त्यानुसार, त्या उमटल्या. पण...
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी तिला तुरूंगाची हवा खावी लागली होती. एक महिन्यानंतर रिया जामिनावर तुरुंगातून बाहेर आली आणि त्यानंतर आता तिचे आयुष्य पूर्ववत होताना दिसत आहे. सुशांत प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दुरावली होती. मात्र परवा महिला दिनानिमित्ताने रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. तब्बल सहा महिन्यानंतर रिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेली पाहून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. त्यानुसार, त्या उमटल्या. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.
होय, अनेकांनी रियाच्या परवाच्या पोस्टवर कमेंट्स करत रियाची माफी मागितली. ‘सॉरी, लोकांनी तुला खूप त्रास दिला. मी संपूर्ण देशाकडून तुझी माफी मागतो. देशाच्या मीडियाने तुला खूप छळले. पण तू फायटर आहेस आणि नेहमीच जिंकशील,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरनेही तिची अशीच माफी मागितली.
सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाव तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही.
काय केली पोस्ट?
सुशांत प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. ऑगस्ट 2020 मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी तिने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केली होती.
रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर होता. या फोटोत तिने एक हात तिच्या हातात घट्ट पकडला आहे.‘आम्हाला महिला दिनाच्या शभेच्छा.. आई आणि मी.. कायम एकत्र..माझी ताकद, माझा विश्वास,माझं मनोबल, माझी आई,’असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.