"हे खूप महागात पडेल"; रिया चक्रवर्ती प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:17 PM2024-10-25T17:17:27+5:302024-10-25T17:18:05+5:30
रिया चक्रवर्तीच्या विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे.
Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना दिलासा देत सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे लुकआउट परिपत्रक रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सीबीआय आणि महाराष्ट्र राज्य सरकारलाही या वेळी फटकारले. हे एक हाय-प्रोफाइल पार्श्वभूमीचे प्रकरण असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टानं म्हटलं. २०२० मध्ये, सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौक चक्रवर्ती, तिचे वडील लेफ्टनंट कर्नल इंद्रजित चक्रवर्ती आणि तिची आई संध्या चक्रवर्ती यांच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले होते.
अभिनेता सुशांत राजपूतच्या मृत्यूप्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार सीबीआचे लुकआउट परिपत्रक रद्द करण्यात आले होते. सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि वडील यांच्याविरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले होते. याविरोधात सीबीआयने मुंबई हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र सरकारचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले.
सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करत पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर हा प्रकार घडला होता. त्यानंतर लगेचच हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मात्र आता लुक आऊट परिपत्रक रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम राहणार आहे. याशिवाय सीबीआयचे अपीलही सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सीबीआयवर खरमरीत टीका केली.
न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने, ही फालतू याचिका आहे. आरोपी हायप्रोफाईल असल्याने याचिका दाखल करण्यात आली असल्याचे म्हटलं. "आम्ही इशारा देत आहोत. आरोपींपैकी एक हायप्रोफाईल व्यक्ती आहे म्हणून तुम्ही ही फालतू याचिका दाखल करत आहात. यासाठी नक्कीच खूप मोठी किंमत मोजावी लागेल. त्यांची मुळे समाजात खोलवर रुजलेली आहेत. सीबीआयला दंड आणि काही कठोर शेरे घ्यायचे असतील तर या विषयावर चर्चा करा," अशा श्ब्दात सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. पोलिसांनी अहवाल नोंदवून तपास सुरू केला. तपासानुसार, रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. मात्र, नंतर मुंबई पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले. यानंतर २०२० मध्येच रिया चक्रवर्तीच्या कुटुंबाविरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आला होते. मुंबई हायकोर्टाने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरुद्ध सीबीआयने जारी केलेला एलओसी रद्द करण्यात आला होते.