सुशांत अचानक रडायचा, घाबरायचा...! उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:38 PM2020-09-03T18:38:57+5:302020-09-03T18:39:16+5:30
सीबीआयने सुशांतवर उपचार करणा-या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुसान वॉकर यांचा जबाब नोंदवला. या जबाबात वॉकर यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयला आत्तापर्यंत सुशांतची हत्या झाल्याचा एकही पुरावा सापडलेला नाही. याशिवाय त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचाही कोणताच पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळे सीबीआयने आता आत्महत्येच्या दिशेने तपास सुरु केला आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता का? या दिशेने सीबीआयच्या तपासाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयने सुशांतवर उपचार करणा-या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुसान वॉकर यांचा जबाब नोंदवला. या जबाबात वॉकर यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘आज तक’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सीबीआयला दिलेल्या जबाबात डॉ. सुसान वॉकर यांनी केलेले दावे बघता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. रिया चक्रवर्ती सुशांतची अतिशय चांगली काळजी घेत होती. सुशांत आपल्या मर्जीने अनेकदा औषधे घेण्याचे थांबवायचा, असे वॉकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.
काय म्हणाल्या?
वॉकर यांनी सांगितले की, ‘सुशांत आपल्या आईच्या अतिशय जवळ होता. आईच्या निधनानंतर तो आपल्या बहिणींच्या क्लोज गेला होता. तो त्याच्या वडिलांच्या क्लोज होता, असे मात्र मला कधीही वाटले नाही. सुशांत अंतराळ, ग्रह-तारे, ब्रह्मांड याबद्दल बोलला होता. मात्र त्याची बोलण्याची पद्धत आणि वागणूक पूर्णपणे अतार्किक होती. तो खूप फास्ट बोलायचा. यावरून तो बायपोलर डिसऑर्डरने पीडित असल्याचे मला समजले होते. सुशांत गेल्या 20 वर्षांपासून या आजाराशी लढत होता, हे मला नंतर समजले.
खूप तरूण असतानापासून त्याला ही समस्या होती. 2013 ते 2014 या काळातही त्याच्यात ही लक्षणे दिसली होती. प्रत्येकवेळी ही लक्षणे आधीपेक्षा वाढलेली दिसायची. सुशांतला त्याच्या या आजाराबद्दल कल्पना होती. त्याला थोडे बरे वाटले की, तो औषधे घेणे थांबवायचा. नियमितपणे मूळ उपचार तो घेत नव्हता. त्याचा आजार बळावल्यावर तो माझ्याकडे आला होता. सुशांतला तात्काळ उपचारांची गरज होती. बायपोलर डिसऑर्डर एकप्रकारचे रासायनिक असंतुलन आहे. यात पैशांची उधळपट्टी करणे, 4-4, 5-5 दिवस न झोपणे, सगळे काही गमवायची भीती, सगळे काही लवकरात लवकर मिळवण्याची घाई अशा गोष्टी होतात. सुशांत अनेकदा रडायचा. माझ्यासोबत बोलतानाही तो रडला होता. स्वत:बद्दल त्याच्या भावना अति नकारात्मक होत्या.
वॉकर यांच्या दाव्यानुसार, सुशांतसोबतच्या सेशलमध्ये त्यांना त्याच्यात घाईघाईत बोलणे, घाईत विचार करणे आणि अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे आढळली होती. एक मिनिटाचा वेळही त्याला अनेक दिवसांप्रमाणे भासायचा. यामुळे तो आणखी जास्त घाबरायचा. त्याला भीती वाटायची. तो अनेकदा रडायचा.
14 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांत डॉ. प्रवीण दादाचंदजी यांच्याकडे गेला होता. दुस-या दिवशी तो पुन्हा डॉ. वॉकर यांच्याकडे आला. यावेळी आपल्याला बायपोलर डिसऑर्डर आहे, याची त्याला खात्री पटली होती. रिया सुद्धा यावेळी त्याच्यासोबत होती. सुशांतला लवकरात लवकर बरे व्हायचे होते. मात्र हे शक्य नव्हते. त्याच्यावर दीर्घकाळ उपचाराची गरज होती.