लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली मतदारसंघातील पाझर तलाव, सिंचन तलाव आणि गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी आमदार श्वेता महाले यांनी चालविलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मतदारसंघातील सुमारे १७ पाझर, सिंचन व गाव तलावासाठीच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३८ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळविल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मतदारसंघातील अमडापूर सिंचन तलाव क्रमांक २ साठी ३८ लाख, केळवद पाझर तलाव क्रमांक २ साठी १८ लाख, महोदरी पाझर तलाव २० लाख, शेलगाव जं. पाझर तलाव २० लाख, वाघापूर गाव तलाव २७ लाख, साकेगाव गावतलाव ११ लाख, गोदरी गाव तलाव क्रमांक २ साठी २९ लाख, मातला सिंचन तलाव २० लाख, शिरपूर पाझर तलाव १६ लाख, आवळखेड पाझर तलाव २९ लाख, दुधागाव तलाव ५ लाख, मातला गाव तलाव २० लाख, अटकळ गाव तलाव २२ लाख, शिरपूर गाव तलाव १६ लाख, मोहज पाझर तलाव क्रमांक १ साठी ११ लाख, मोहोज पाझर तलाव क्रमांक २ साठी ९ लाख याप्रमाणे सुमारे १ कोटी ३८ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली आहे. मतदारसंघात अनेक वर्षांपासून सिंचन, पाझर व गाव तलावांच्या दुरुस्तीसाठी मागणी होती. परंतु निधी नसल्याने दुरुस्तीची कामे रखडली होती. पर्यायाने या तलावांची साठवण क्षमता कमी झाली होती. शासनाकडून या पाझर, गाव व सिंचन तलावांची वर्गवारी करून पहिल्या टप्प्यात अती नादुरुस्त तलावांना निधी उपलब्ध करून दिला आहे. यानुषंगाने आमदार श्वेता महाले यांनी सातत्याने पाठपुरावा चालविला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, मतदारसंघातील इतर तलावांच्या दुरुस्तीसाठी देखील टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.महाले यांनी दिली आहे.
..............................