नाना हिवराळेखामगाव(जि. बुलडाणा), दि. १९- शेतकर्यांना घरबसल्या एसएमएसद्वारे कृषीविषयक सल्ला देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, किसान एसएमएस सेवा सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार शेतकर्यांची आतापर्यंत एसएमएस सेवेमध्ये नोंदणी झाली आहे.शेतकर्यांना एसएमएसद्वारे कृषीविषयक सल्ला, हा कार्यक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यस्तरावरील १३८ लाख शेतकर्यांपैकी किमान ५0 लाख शेतकर्यांना किसान एसएमएस सेवेमध्ये आणण्याचा शासनाचा मानस आहे. किसान एसएमएस सेवेद्वारे शेतकर्यांना घरबसल्या कृषिविषयक विविध योजनांची माहिती, हवामानाचा अंदाज, नवनवीन तंत्रज्ञान, खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करावयाची कामे, फळबाग, भाजीपालावर्गीय पीकनिहाय माहिती देण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग त्या भागातील शेतीची परिस्थिती ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) पाठविली आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांना एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाते. या माहितीच्या आधारे त्या भागात पिकावरील रोगराई, कीडविषयक सल्ला, पेरणीची वेळ, मशागतीची योग्य वेळ याविषयी सविस्तर माहिती एसएमएसद्वारे पाठविली जाते. तालुका कृषी कार्यालयातील प्रती कृषी सहायक शेतकरी मित्र यांना किमान ५00 शेतकर्यांची माहिती नोंदणी करण्याचे लक्ष्यांक दिले आहे. शेतकर्यांच्या सार्वत्रिक विकासासाठी शासन कृषी विभागाकडून विविध उपाययोजना राबवित असताना आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा शेतकर्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नरत आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक नोंदणीकृषिविषयक सल्ला तसेच पीक हवामानाचा अंदाज, याविषयी शेतकर्यांना माहिती किसान एसएमएस सेवेमधून मिळते. तालुकास्तरावर कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) शेतकरी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामध्ये जिल्ह्यातून खामगाव तालुक्यात सर्वाधिक २८ हजार ७0३ शेतकर्यांची नोंदणी झाली आहे., तर सर्वाधिक कमी नोंदणी शेगाव तालुक्यात ५७७0 शेतकर्यांची आहे. सर्वच शेतकर्यांना किसान एसएमएस सेवेमध्ये सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
१ लाख ८७ हजार शेतक-यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 12:24 AM