- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: देशाचे रक्षण करणाºया सैनिकांच्या मदतीसाठी केले जाणारे ध्वज दिन निधी संकलन अंतीम टप्प्यात आहे. मात्र ध्वज निधी संकलनाच्या या देशकार्यात राज्य उत्पादन शुल्काचा हात आखडता दिसून येत आहे. निधी संकनासाठी ३० नोव्हेंबर ही अंतीम मदत देण्यात आलेली असतानाही आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ८८ टक्के उद्दिष्ट अपूर्णच आहे. सैन्यामधील ९० टक्के सैनिक हे ३५ ते ४० या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे. तसेच हा संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सिमेवर कायम कार्यरत असणाºया सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. सैनिकांसाठी भरघोस निधी जमा व्हावा, यासाठी शाळा, महाविद्यालयांसह शासनाच्या विविध विभागांना एक उद्दिष्ट देण्यात येते. सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान असल्याने प्रत्येक नागरिक व विद्यार्थी जास्तीत जास्त निधी संकलनासाठी प्रयत्न करताना दिसून येतात. परंतू या महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग माघारल्याचे दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला ध्वज दिन निधी संकलनाचे २ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. निधी संकलनासाठी केवळ १० दिवसांचा अवधी उरलेला असतानाही आतापर्यंत बुलडाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ १२ टक्के म्हणजे ३० हजार रुपये निधी जमा केल्याची माहिती आहे. मागील वर्षीचाही निधी या विभागाने पूर्ण जमा केलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ध्वज निधी गोळा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर अंतीम मुदत आहे. मुदतीपर्यंत निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. प्रत्येकाने या देशकार्यात हातभार लावावा.- स. ह. केंजळे,जिल्हा सैनक कल्याण अधिकारी