बुलडाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यानुसार १० टक्के शाळांनी निकालाच्या टक्केवारीचे शतक गाठले आहे. मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा लागली होती. अखेर ८ जून रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालावरच शाळेचे यश अवलंबुन असते. अनेक पालक तर दहावीचा निकाल पाहून आपल्या पाल्याला त्या शाळेत टाकायचे की नाही, हे ठरवतात. त्यामुळे दहावीचा उत्कृष्ट निकाल लागावा, अर्थात १०० टक्के निकालासाठी शाळा कसोशीने प्रयत्न करते. जिल्ह्याचा एकूण निकाल ७७.०७ टक्के लागला आहे. यंदाच्या दहावीच्या निकालात अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५१८ शाळांपैकी १० टक्के शाळा म्हणजे ५२ शाळांनी १०० टक्के निकालावर मजल मारली आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये बुलडाणा तालुक्यातील आठ, मोताळा चार, चिखली तालुक्यातील १०, देऊळगाव राजा तालुक्यातील पाच, सिंदखेड राजा चार, लोणार दोन, मेहकर दोन, खामगाव नऊ, शेगाव एक, नांदूरा १, मलकापूर दोन, जळगाव तीन व संग्रामपूर तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. अशा जिल्ह्यातील एकूण ५२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यातील काही शाळा गतवर्षी सुद्धा १०० टक्क्यावर होत्या. १० टक्क्यापर्यंत च्या तीन शाळा जिल्ह्यातील तीन शाळा १० टक्क्यापर्यंत पोहचू शकल्या. मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलचा निकाल अवघा ८.६९ टक्के लागला आहे. तर मेहकर तालुक्यातील शिंगणे विद्यालय खंडाळाचा निकाल ६.८९ टक्के लागला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुलचा निकाल १०.३४ टक्के लागला आहे. चिखली अव्वल दहावीच्या १०० टक्के निकालात चिखली तालुक्यातील शाळांची संख्या सर्वाधिक आहे. चिखली तालुक्यातील १० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालात १० टक्के शाळांनी गाठले शतक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:48 PM