- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : जिल्ह्यात चांगले महाविद्यालय असताना जवळपास १० हजार विद्यार्थी इतर जिल्ह्यात फक्त नावालाच प्रवेश घेवून शिक्षण घेत आहेत. यासाठी एका एजंटमार्फत कथितस्तरावर ५० हजार रूपये घेवून प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून बायोमॅट्रीकच्या सक्तीची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण मिळावे, या हेतूने अनेक सेवाभावी संस्थांनी कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहेत. आजरोजी जिल्ह्यात जवळपास २५० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक महाविद्यालयात मोजकेच विद्यार्थी प्रवेश घेतात. इतर विद्यार्थी मात्र बुलडाणा जिल्हा सोडून कोटा, नागपूर, अकोला, लातूर, पुणे, औरंगाबाद आदी मोठ्या शहरात नावाजलेल्या खाजगी क्लासेसला प्रवेश घेवून अभ्यास करतात, मात्र परीक्षा देण्यासाठी रहिवासी असलेला बुलडाणा जिल्हा सोडून लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयात जातात. त्यात बुलडाणा जिल्ह्यालगत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील कासमपूरा, शेंदुर्णी तसेच मराठवाड्यातील काही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील २५० कनिष्ठ महाविद्यालयावर होत असून विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. यासाठी शासनाने हजेरीसाठी बायोमॅट्रीक पध्दत सुरू केली आहे. मात्र ही पध्दत संपूर्ण राज्यात सुरू करणे गरजेचे आहे.
५० हजार भरा, महाविद्यालयात येवू नका
कोटा, लातूर या ठिकाणी मोठ्या क्लासेसमध्ये शिक्षण घेवून फक्त परीक्षा देण्यासाठी इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील फक्त नावालाच कनिष्ठ महाविद्यालात प्रवेश घेणारे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ५० हजार भरा, महाविद्यालयात येवू नका, अशी आॅफर एजंट मार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येते. अशा प्रकारे लाखो रूपये कमाई करणारे बोगस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाहीत. या महाविद्यालयात प्रत्यक्षात कोणतेच प्राध्यापक नाहीत, प्रॅक्टीकल करून घेतले जात नाही. मात्र कागदोपत्री सर्वत्र आलबेल दाखवून सदर महाविद्यालये करोडो रूपयांची कमाई करीत असल्याची चर्चा आहे.
बायोमॅट्रीकवर शोधला पर्याय
जिल्ह्यातील विद्यार्थी इतर जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेत असल्यामुळे शहरातील चांगले महाविद्यालयात विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यासाठी शासनाने १५ जून रोजी एका शासन आदेशान्वये महाविद्यालयात बायोमॅट्रीकची सक्ती केली आहे. मात्र यावर्षी अमरावती विभाग वगळण्यात आला आहे. मात्र पुढच्यावर्षी बायोमॅट्रीकची सक्ती करण्यात येणार असल्यामुळे फक्त विद्यार्थ्यांना नावालाच प्रवेश देणाºया महाविद्यालय, संस्थांचे धाबे दणाणले आहे. मात्र यावरही काही महाविद्यालयाने पर्याय शोधला असून एकाच विद्यार्थ्यांचे दोन, तीन वेळेस थम्स घेवून बोगस विद्यार्थी दाखविण्याचा पर्याय शोधला असल्याची चर्चा आहे.
हुशार विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा
ग्रामीण भागातील महाविद्यालयात फक्त नावालाच प्रवेश घेतलेल्या हुशार विद्यार्थ्यासाठी हा प्रकार धोक्याची घंटा ठरू शकतो. या हुशार विद्यार्थ्याचा मेडीकल किंवा आयआयटीला नंबर लागला. त्याची तक्रार कमी गुण मिळविणाºया विद्यार्थ्याने केल्यानंतर हुशार विद्यार्थ्याची महाविद्यालयात घेतलेली थम्स प्रिंट व प्रत्यक्ष समोर घेतलेली थम्स प्रिंटमध्ये फरक पडल्यास त्याचा प्रवेश रद्द होवू शकतो. तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल होवू शकतो.
विद्यार्थ्यांना फक्त नावालाच प्रवेश देणाºया महाविद्यालयाच्या बोगसगिरीला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात बायोमॅट्रीकची सक्ती करावी, मेडीकलसह इतर अभ्यासक्रमाच्या जागा सर्व विभागाला समान द्याव्यात तसेच विद्यार्थ्यांसाठी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम ठेवावा.
-आर. ओ. पाटील, एडेड कनिष्ठ महाविद्यालय, बुलडाणा.