सुधीर चेके पाटील चिखली(जि. बुलडाणा), दि. १३- सलग तीन वर्षांनंतर गत पावसाळय़ात तालुक्यात थोडासा दिलासादायक पाऊस झाल्याने यंदा पिकांची स्थिती उत्तम आहे; मात्र तीन वर्षांच्या अत्यल्प वृष्टीमुळे खालावलेल्या भूजल पातळीमुळे यंदा पाण्याची स्थिती थोडी चिंताजनक असून, आतापासूनच तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे, तर येत्या उन्हाळय़ात तालुक्यातील १४४ गावांपैकी आतापासूनच तब्बल ८२ गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे, तर येत्या एप्रिलनंतर यामध्ये आणखी २२ गावे वाढणार असल्याने पाण्यासाठी हाहाकार उडणार असल्याचे चित्र आहे, तर आगामी काळात तीव्र पाणीटंचाईच्या सावटाखाली येणार्या गावांच्या टंचाईची तीव्रता लक्षात घेता पंचायत समितीच्यावतीने आढावा घेण्यात आला असून, उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.चिखली तालुक्यात तसेच परिसरात महत्त्वाच्या असलेल्या धरणात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला होता; मात्र उन्हाळा लागण्यास अद्याप अवधी असतानाही धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. लहान-मोठे प्रकल्प, पाझर तलाव, नद्या, विहिरी, बोअरवेल यावरच पाणीपुरवठय़ाची संपूर्ण मदार अवलंबून आहे; मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या जलस्रोतांनी तळ गाठायला सुरुवात झाली आहे. परिणामी, अनेक गावातील नागरिकांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून, ही समस्या येत्या काळात गंभीर रूप धारण करण्याची चिन्हे आहेत. या धर्तीवर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा पंचायत समितीला तयार केला असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, आडवे बोर, नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना राबविणे व नवीन हातपंप देणे अशा उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान तालुक्यातील उंद्री, दिवठाणा, आमखेड, बोरगाव वसु, तेल्हारा, उत्रादा, पेठ, किन्ही नाईक, कवठळ, खोर, टाकरखेड हेलगा, अंत्री खेडेकर, साकेगाव, मेरा बु. काटोडा, किन्ही नाईक, हिवरा नाईक, धोत्रा नाईक, ब्रम्हपुरी, कोलारी, गिरोला, पळसखेड दौलत, टाकरखेड मुसलमान, ऐनखेड, बोरगाव काकडे, रानअंत्री, भोकर, शेळगाव आटोळ, तोरणवाडा, डासाळा, हातणी, वळती, मालगणी, मोहदरी, असोला नाईक, मेडसिंग, चंदनपूर, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अमोना, देऊळगाव धनगर, पिंपळवाडी, असोला बु., कोनड खु., शेलसूर, कव्हळा, सावरखेड नाईक, पिंपरखेड, कारखेड, हराळखेड, पांढरदेव, शेलगाव जहॉं, आंधई, सोमठाणा, भोगावती, सैलानीनगर, तांबुळवाडी, मेरा खु., मलगी, शेलूद, शिंदी हराळी, चांधई, दहीगाव, महिमळ, सावंगी गवळी, भालगाव, बेराळा, हरणी, वैरागड, अंबाशी, ईसोली, शेलोडी, पाटोदा, वरवंड, करणखेड, खामखेड, खंडाळा मं., सावरगाव डुकरे, मुंगसरी, गांगलगाव, रोहडा, किन्होळा या ८२ गावांवर आतापासूनच पाणीटंचाईचे सावट असून, यावर मात करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या ८२ गावांव्यतिरिक्त एप्रिलनंतर अमडापूर, एकलारा, गुंजाळा, मनुबाई, मिसाळवाडी, मंगरूळ (इ.), इसरूळ, मंगरूळ नवघरे, सवणा, खैरव, काळोणावाडी, भरोसा, आंधई, धोडप, डोंगरशेवली, कोलारा, पळसखेड सपकाळ, माळशेंबा, केळवद, येवता, तेल्हारा व मुरादपूर या २२ गावांनादेखील तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
१0४ गावांवर पाणीटंचाईचे सावट!
By admin | Published: February 14, 2017 12:32 AM