नांदुरा : बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील तरवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पोटा या ७०० लोकसंख्येच्या गावात १५० नागरिकांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी ७८ जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने अख्खे गावच कटेन्मेंट झोन जाहीर केले. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड अंतर्गत येत असलेल्या या गावामध्ये १३ एप्रिल रोजी कोणतीही आरोग्य सुविधा पुरवल्या न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून आरोग्य विभागाने या गावाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पोटा या गावात यापूर्वी १६ रुग्ण आढळले होते .तर एक मृत्यूही झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या. त्यामध्ये गावात एकूण १०५ रुग्णसंख्या झाल्याने अख्खे गावच कंटेंनमेंट झोन जाहीर केले आहे. १३ रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात फिरकलेच नाहीत. तर गावातील ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, व आशा वर्कर्स यांनी गावातील नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची ची तपासणी केली. निगराणी व तपासणी कॅम्प लावा, असा आदेश असूनही आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. आडवळणाच्या या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेडा याअंतर्गत हे गाव असून ते हॉटस्पॉट बनले असतानाही तिथे नियमित मेडिकल कॅम्प लावला गेला नाही. या गावासाठी २४ तास एक डॉक्टरांचा चमू आरोग्य विभागाने देऊन नियमित आरोग्य सेवा पुरवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मळ्यात बसवले बिऱ्हाड
पोटा गाव हॉटस्पॉट झाल्याने गावातील काही नागरिकांनी गावाजवळच्या मळ्यातच राहणे पसंत केले आहे. काही नागरीक गावातून आपल्या दैनंदिन गरजेपुरते साहित्य घेऊन गावाबाहेरील मळ्यात वास्तव्य करीत असल्याचे दिसून आले.