बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आजपासून अधिकृतरीत्या प्रक्रिया सुरू केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक उत्तर प्रदेशचे आमदार पंकज मलिक यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाकरिता ११ दावेदार समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीकरिता आजपासून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या केंद्रीय निरीक्षक मलिक हे मुलाखती घेणार आहेत. आज सकाळी बुलडाणा, दुपारी चिखली व खामगाव या मतदारसंघाच्या मुलाखती घेऊन उद्या जळगाव जामोद, मलकापूर या मतदारसंघाच्या मुलाख ती होणार आहेत. आज बुलडाण्यात सकाळी १0 वाजल्यापासूनच स्थानिक विश्राम गृहावर इच्छुक उमेदवारांची गर्दी जमली होती. निरीक्षकांचे १२ वाजता आगमन झाल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी आ.मलिक यांचे स्वागत केले. मलिक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत इच्छुक उमेदवारांना वैयक्तिकरीत्या वेळ दिला व उमेदवारीचा दावा समजून घेतला. या मुलाखतीमध्ये गेल्यावेळचे उमेदवार माजी आ.धृपदराव सावळे यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, मुख्त्यारसिंग राजपूत, जयश्रीताई शेळके, मीनल आंबेकर, डॉ.मधुसूदन सावळे, योगेंद्र गोडे, नाथाभाऊ खर्चे, विश्वनाथ माळी, अंकुश वाघ यांचा समावेश आहे. सर्वांनी आपला बायोडाटा निरीक्षकांना दिला आहे. चिखलीत तीन तर खामगावात फक्त एक दावाचिखली मतदारसंघासाठी झालेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह माजी जि.प.अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर तसेच अशोक सुरडकर यांनी निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या. खामगाव मतदारसंघामध्ये आ. दिलीपकुमार सानंदा हे नगराध्यक्ष निवडणुकीच्या फिल्डींगसाठी व्यस्त असल्याने त्यांच्यावतीने त्यांच्या प्रतिनिधींनी निरीक्षकांसमोर आ.सानंदा यांचे नाव सुचविले.
बुलडाण्यात काँग्रेसचे ११ दावेदार
By admin | Published: July 16, 2014 11:55 PM