माती बंधाऱ्यामुळे नुकसान
लोणार : तालुक्यातील टिटवी महसूल मंडळामध्ये धाड, नांद्रा आणि टिटवी परिसरामध्ये वनविभाग आणि लघु पाटबंधारे विभागातर्फे माती बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे यातील काही बंधारे वाहून गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील काही भागांत २२ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्याचाही शेतीपिकांना फटका बसला होता. सध्या या भागातील नुकसानाचे सर्वेक्षण सुरू आहे. सोबतच माती नाला बांधकामाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसानानंतर मदतीची प्रतीक्षा
मेहकर: तालुक्यात यावर्षी काही भागात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतीपिकांचेही नुकसान झालेले आहे. २८ जूनला झालेल्या अतिवृष्टीदरम्यान १०९.५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा तालुक्यातील ३३७ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्वरेने नुकसानभरपाई देण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.