प्लास्टिकने शेतीच्या सुपिकतेला धोका
धाड: चांगले उत्पादन होण्यासाठी शेतकरी शेतात शेणखत टाकतात. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. ज्यामुळे शेतीच्या सुपिकतेला धोका पोहचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सुलतानपूर येथे पॉझिटिव्ह
सुलतानपूर: लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अनेक दिवसानंतर कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. कोरोना रुग्ण वाढण्यास सुरुवात झालेली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष घटक योजनेत ३० टक्के महिलांना लाभ
बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जाती (एस.सी) प्रवर्गातील लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेनुसार ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये ३ टक्के दिव्यांग व ३० टक्के महिला अर्जदारांचा समावेश बंधनकारक केलेला आहे.
पाताळगंगा नदीतून रेती उपसा
किनगाव राजा : पाताळगंगा व खडकपूर्णा नदीत गावापासून काही अंतरावर वाळू माफियांनी रेतीचा अवैध उपसा सुरू केला आहे. खुलेआम ट्रॅक्टरच्या व टिप्परच्या साहाय्याने रेती उपसा होत आहे. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. रात्रंदिवस पातळगंगा नदीपात्रातून हजारो ब्रास रेती वाहून नेल्या जात आहे.
स्मार्ट कार्ड काढणे बाकीच
अमडापूर: राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. मात्र पुरेशा माहितीअभावी ज्येष्ठ नागरिकांना पळापळ करावी लागली. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड काढणे बाकीच आहे.
गारठा झाला कमी
बुलडाणा : गेल्या आठवड्यात जोराची असलेली थंडी आता काहीशी ओसरली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी गर्मी वाढण्यास सुरुवात होते. परंतु अवकाळी पावसाने वातावरणात बदल झालेला आहे. परंतु थंडीचा जोर आता कमी होत आहे.
शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव
लोणार: स्थानिक पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत आहे. शासकीय कार्यालयातील पाण्याची टाकी सध्या सध्या शोभेची वास्तू बनली आहे. त्यामुळे विकतच्या पाण्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागते.
आरोग्य केंद्रामध्ये वाढले रुग्ण
डोणगाव : येथील खासगी दवाखान्यांची फी वाढल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखान्यावर परिसरातील २७ लहान मोठी गावे व वाशीम जिल्ह्यातील काही गावांचे आरोग्य अवलंबून आहे.
बेशिस्त वाहतुकीमुळे अडथळा
मेहकर : शहरातील लोणार वेस येथील प्रवाशांसाठी बांधण्यात आलेला प्रवासी निवारा पूर्णपणे अतिक्रमणाच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे दुचाकी व इतर वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
हिवरा आश्रम येथील आठवडी बाजार बंद
हिवरा आश्रम: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी हिवरा आश्रम येथे मंगळवारी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार आहे.