हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढल्याचा सिकलसेलग्रस्तांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे कुटुंबीयांसह जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना आर्थिक हातभार मिळणार आहे.संजय गांधी निराधार योजनेत अनेक सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यापूर्वी कुटुंबीयांचा आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम मिळत होती. आता नवीन बदलानुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे कुटुंबीयांसह सिकलसेलग्रस्तांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन २0११ ते २0१७ दरम्यान जिल्ह्यात १३ तालुक्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९0 सिकलसेलग्रस्त रुग्ण आहेत. त्यात बुलडाणा तालुक्यातील ३५, चिखली १८, देऊळगाव राजा ११, सिंदखेड राजा २, मेहकर १0, लोणार ८, खामगाव ३२, शेगाव १२, संग्रामपूर १५, जळगाव जामोद ५, नांदूरा ६, मलकापूर २0 व मोताळा तालुक्यात १५ असे एकूण १९0 सिकलसेलग्रस्त आहेत. त्यापैकी १८ वर्षावरील ११५ सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
१८ वर्षाखालील ७५ रुग्णजिल्ह्यात १९0 सिकलसेलग्रस्त असून, त्यापैकी ७५ सिकलसेलग्रस्त १८ वर्षाखालील असल्यामुळे त्यांचे प्रस्ताव पालकांच्या संमतीने संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार्या ११५ सिकलसेलग्रस्तांसोबत १८ वर्षांखालील उर्वरित ७५ सिकसेलग्रस्तांना भविष्यात लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.