१२ लाखांचा गुटखा जप्त
पिंपळगाव सराई : रायपूरमधील एका घरातून जवळपास १२ लाख रुपये किंमतीचा ६४ पोते गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व रायपूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी पंचनामा करुन गुटखा ताब्यात घेतला. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा बंदी केली आहे. तरीही शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत अवैध गुटखा विक्री केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान रायपूर येथील घरातून अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचा ६४ पोते गुटखा जप्त केला. रायपूरसारख्या खेड्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या गुटख्याचे धागेदोरे चिखलीशी जोडलेले असल्याची चर्चा आहे. रायपूर येथील सैय्यद सौदागर यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ आपले पथक रायपूर येथे पाठविले. एलसीबी पथकाने रायपूर पोलिसांच्या मदतीने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घरावर छापा टाकून ६४ पोते गुटखा जप्त केला. जप्त केलेला गुटखा खासगी वाहनाने रायपूर पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. दरम्यान मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नवलकर घटनास्थळी पोहचले व त्यांनी गुटखा ताब्यात घेतला. याप्रकरणी सैय्यद सौदागर व शे. असलम शे. अफसर यांना रायपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायपूरचे ठाणेदार प्रशांत सपकाळे, शांताराम जाधव, विजय पैठणे, मनिषा खंदे, दीपक राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक इनामदार, एएसआय प्रकाश राठोड, सादीक शेख, श्रीकृष्ण राऊत, संदीप मोरे, भरतसिंह राजपूत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.