कोरोना संक्रमणातून कशीबशी तांदूळवाडी ग्रामस्थांनी सुटका केली असतानाच गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे . गावातील सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने पाण्याची डबकी साचत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावात १२ जणांना डेंग्यू सदृश ताप आला आहे. साखरखेर्डा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यामध्ये सुमित श्रीकृष्ण मारके , सौरभ समाधान मारके, निखील उद्धव पिठले , सोहम उद्धव पिठले , सानिका पंढरी बुंधे , पल्लवी गजानन काटकर , तृप्ती संजय गोल्डे , शिवराज बुंधे , वेदांत गजानन काकडे यांच्यासह इतर रुग्णांचा समावेश आहे. या अगोदर शेंदुर्जन गावातही डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत . ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती कोरोना काळात खालावली असतांना एका रुग्णाला उपचारासाठी ५० ते ६० हजारापर्यंत खर्च येत असल्याने पैशाची जुळवाजुळव करता करता पालकांची दमछाक होत आहे . याची दखल घेऊन आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी श्रीकृष्ण मारके यांनी केली आहे.
तांदूळवाडीत डेंग्यू सदृश तापाचे १२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:51 AM