खामगाव: पुरातन परंपरा जोपासताना खामगाव शहरातील गडकऱ्यांनी (गाडे ओढणारे) अतिशय कठिण परिश्रमातून गाड्या ओढून खंडेरायांवर श्रद्धा अर्पण केली. सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव खामगाव शहरातील जगदंबा रोड आणि तालुक्यातील जनुना येथे १२ गाड्या ओढण्याचा अनोखा उत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने मंगळवारी सायंकाळी पार पडला. खामगाव शहरातील जगदंबा रोडवर खंडोबाचे पुरातन ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिरात गत दीडशे वर्षांची परंपरा असलेला गाड्या ओढण्याचा उत्सव साजरा करण्यात येतो.
तत्पूर्वी पौर्णिमेपूर्वी मंदिरात घट स्थापना केली जाते. त्यानंतर चैत्र नवमीच्या अडीच दिवस आधी गडकऱ्यांची हळद माखणी आणि मिरवणूक काढण्यात येते. चैत्र नवमीला खामगाव येथील गौतम चौकातून जगदंबा मंदिरापर्यंत तर जनुना येथील रेणुका माता मंदिर परिसरात १२ गाड्या ओढल्या जातात. परंपरेनुसार मंगळवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या साक्षीने भाविक आणि बच्चे कंपनी बसलेल्या गाड्या डफड्याच्या तालात ओढल्या. हा सोहळा याचि देही याचि डोळा साठविण्यासाठी दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
हळदीच्या भंडाऱ्याची उधळण१२ गाड्या ओढण्यासाठी गडकरी गौतम चौकापर्यंत वाजत गाजत येत होते. ठराविक अंतरापर्यंत गाडे ओढून पुन्हा वाजत गाजत जगदंबा मंदिरापर्यंत जात होते. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा गाडे ओढण्यासाठी गौतम चौकात येत हाेते. असा त्यांचा क्रम सर्व गाडे मंदिरापर्यंत सुरू होता. यावेळी डफड्याच्या तालात भाविक हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत होते. जनुना येथील रेणुका माता मंदिर परिसरात गाडे ओढण्यासोबतच, महाप्रसाद आणि रात्री यात्रोत्सवही येथे पार पडला.