- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र असलेल्या जाळीचा देव येथील अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेव्दारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञान स्पर्धेत सहभाग घेवून राज्यातील जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी भगवद् गीतेचा अभ्यास केला. त्यात अमरावती व अकोला येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवांचा समावेश आहे. महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य श्री लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पासून गोकूळ अष्टमीच्या महापर्वानिमित्त राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला असून, दरवर्षी जवळपास २५ हजार स्पर्धक परीक्षेसाठी नोंदणी करीत आहेत. यापूर्वी सदर ज्ञान स्पर्धा श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे घेण्यात येत होती. त्यानंतर मागील १५ वर्षांपासून बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील गोपाल आश्रमातील पंचकृष्ण मंदिर परिसरात घेण्यात येत आहे. एकूण २५ वर्षांच्या कार्यकाळात या परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी, तरुणांनी अध्यात्मासोबत विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात केले आहे. सदर परीक्षा देणाºया अभ्यासकास गीतेच्या माध्यमातून काम-क्रोधावर नियंत्रण ठेवून मन एकाग्र करता येते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनासाठी या परीक्षेचा उपयोग होत आहे. या परीक्षेसाठी तसेच आश्रमातील विविध शिबिराच्या माध्यमातून आजही आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्य, अहिंसा, आदरभाव, भूतदया, कार्यदक्षता, मानवता, श्रीमद् भगवद् गीता तत्त्वज्ञान, आरोग्य, ज्ञान-विज्ञान या विषयावर ज्ञान देण्यात येते. यावर्षी १९ आॅगस्ट २०१८ रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा मराठी माध्यमातून वस्तुनिष्ठ पध्दतीने घेण्यात आली. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यात असलेल्या जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात असलेले ४० व अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात असलेले १० कैदी बांधवांनी सहभाग घेतला.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन
बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील श्री गोपाल आश्रमातील श्रीपंचकृष्ण मंदिर येथे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचे आयोजन ११ व १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. प्रारंभी ११ सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी गीतापारायण, ध्वजारोहण, धर्मसभा, महाप्रसादसह राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेद्वारे श्री गोपाल आश्रम परिसरात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवात विविध कार्यक्रमासह राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्पर्धक व भाविकांनी सहभागी व्हावे.
- आचार्य लोणारकर मोठे बाबा, गोपाल आश्रम, अजिंठा रस्ता, बुलडाणा.