लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : केंद्रीय अर्थसंकल्पात वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी जाहीर करण्यात आली आहे. या पॉलिसीची काटेकोर अंमलबजावणी केल्यास जिल्ह्यातील १२ टक्के म्हणजे तब्बल ६० हजार वाहने भंगारात निघणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाहनांच्या स्क्रॅपिंग धोरणामुळे १५ वर्षांवरील वाहने रस्त्यावर धावण्यासाठी अपात्र ठरणार आहेत.
रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागाची आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडील १५ वर्षांहून जुनी सरकारी वाहने आता थेट भंगारात निघणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील तब्बल साठ हजारांपेक्षा अधिक वाहने रस्त्यांवर धावण्यासाठी अपात्र ठरणार आहेत.
चौकट...
शासकीय कार्यालयांतील अडगळ होणार दूर!
सरकारी विभाग आणि पीएसयूच्या मालकीच्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करणे आणि स्क्रॅपिंगच्या धोरणाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या आवारात सडत असलेली हजारो वाहने भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्ह्यातील विविध कार्यालयातील अडगळ दूर होण्यास मदत होईल.
चौकट...
अशी आहे जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या
दुचाकी: ३ लाख ९२ हजार २४१
मोटार कार : २७ हजार ३३४
ट्रॅक्टर: २६ हजार ५८५
ट्रॅक्टर-ट्रॉली: १२ हजार ३३४
गुड्स कॅरिअर : १९ हजार ५८४
ऑटो रिक्षा : १४ हजार ९९३
कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट : ४६२
स्कूल बस : ५०६
इतर : १ हजार ८३
एकूण : ४ लाख ९७ हजार १९८
कोट...
- वाहनांच्या स्क्रॅपेज पॉलिसीच्या अंमलबजावणीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्व प्रकारची पाच लाख वाहने आहेत. यांपैकी १५ वर्षांवरील वाहने भंगारात निघणार आहेत. त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील १५ वर्षांवरील वाहनांची माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
--------------