नांदुरा (बुलडाणा): नगरपालिकेचा शहरातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी तसेच दुकान भाड्याची वसुली, असा ८५ टक्के कर थकीत झाला आहे. थकबाकीदारांना वारंवार नोटीसा देऊनसुद्धा नागरिक नगरपालिकेचा कर भरत नसल्याने मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी पाच पथकांमध्ये ४0 कर्मचार्यांची नियुक्ती करून कर वसुलीसाठी ९ मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. नांदुरा नगरपालिकेची घरपट्टीची कर वसुली २ कोटी ४२ लाख ३९ हजार २३९ रुपये असून, यापैकी केवळ ५४ लाख ७८ हजार ५९२ इतकीच करवसुली ९ मार्चपर्यंत झाली आहे. या वसुलीचे प्रमाण केवळ २३ टक्केच आहे, तर पाणीपुरवठय़ाची १ कोटी २२ लाख ९३ हजार 0६७ रुपये वसुलीपैकी केवळ ३५ लाख ७३ हजार २२0 रुपये एव्हढीच वसुली झाली असून, ही केवळ २९ टक्केच आहे. अशी दोन्ही मिळून संपूर्ण शहराची वसुली केवळ २५ टक्केच आहे. त्यामुळे ९ मार्च रोजी पाणीपट्टी कराचा भरणा न करणार्या १२५ नागरिकांचे नळ कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता निरज नाफडे यांनी दिली. शहराला विकास कामाचा निधी मिळण्यासाठी ८५ टक्क्यापेक्षा जास्त कर वसुली करणे नगरपालिकांना बंधनकारक असते. परंतु यावर्षी ही वसुली अत्यल्प असल्याने पाच पथकांमध्ये ४0 कर्मचार्यांची विशेष वसुली पथक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१२५ ठिकाणची नळजोडणी केली खंडित
By admin | Published: March 10, 2016 2:04 AM