कारचा अपघात दोन महिला जखमी
लोणार : भरधाव कारचा ताबा सुटल्याने कारचा अपघात होऊन दोन महिला जखमी झाल्याची घटना रविवारी पांग्रा रोडवर घडली. लोणारवरून लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघात दीपाली संजय चाटे (३७, रा. पांग्रा डोळे) व जनाबाई दिगांबर चाटे (२६,) ह्या जखमी झाल्या आहेत.
पापडासाठी सोलाचे दर वाढले
हिवरा आश्रम : सध्या महिलांची पापड करण्याची लगबग सुरू आहे. त्यात मूग, उडीद हा शेतमाल पावसाने खराब झाला आहे. त्यामुळे पापडासाठी लागणारा मूग, उडिदाचा सोल सध्या महाग झाल्याचे दिसून येत आहे. प्रतिकिलोचे दर १०० रुपयांवर आहेत.
सिकलसेल आजार ; जनजागृतीला फटका
देऊळगाव मही : आरोग्य विभागामार्फत सिकलसेल आजार नियंत्रण निमित्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा आदी ठिकाणी सिकलसेल आजार निमित्त माहिती व उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. परंतु कोरोना संसर्गामुळे सिकलसेल आजार नियंत्रणाच्या जनजागृतीला फटका बसला आहे.
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वर्दळ
मेहकर : शहरातून जाणाऱ्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावर जड वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बरेच वाहने बायपास मार्गाने जाणे दूर पडत असल्याने शहरातून जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक विहिरी आटल्या
जानेफळ : परिसरातील अनेग गावामध्ये असलेल्या सार्वजनिक विहिरी बुजण्याच्या मार्गावर आहेत. ग्रा.पं.च्या हद्दीत येणाऱ्या सार्वजनिक विहिरीत घाण कचरा टाकला जात असल्याने विहिरीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी पिण्यासाठी अशुद्ध होत आहे. अनेक विहिरी आता आटल्या आहेत.
गावात धूर फवारणी करण्याकडे दुर्लक्ष
दुसरबीड : अनेक भागात अस्वच्छता पसरली असून यामुळे डासांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोना संसर्गाचे रुग्ण आता कमी झाले असल्याने धूर फवारणी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती ठप्प
सुलतानपूर : ‘बेटी पढाव बेटी बचाव’साठी युद्धपातळीवर जनजागृती करण्यात येत होती. परंतु शाळा, महाविद्यालय बंद असल्याने व आरोग्य विभाग कोरोनाच्या कामामध्ये व्यस्त असल्याने जनजागृतीचे कार्यक्रम ठप्प आहेत.
शेतकरी पीक विम्यापासून वंचित
किनगाव राजा : अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर केली आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात नुकसान भरपाईमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत.
फळबागाकडे शेतकऱ्यांचा कल
बुलडाणा : पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीत आता बदल होत आहे. पारंपरिक पिकांना बगल देत परिसरातील शेतकरी पेरू व सीताफळ लागवडीकडे वळले आहे. यामधून त्यांना भरघोस उत्पन्न मिळते. होतकरू व कष्टकरी शेतकऱ्यांना या समृद्धीचा मार्ग गवसला आहे.
स्वच्छतागृहाची झाली दुरवस्था
बुलडाणा : शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था झाली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये ही अनेक शौचालय निरूपयोगी ठरत आहेत. काही अधिकारी, कर्मचारी सुद्धा बाहेरच जातात.