लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोरोना या आजाराने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. या धर्तीवर मलकापूर पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान मंगळवारी सकाळी मालवाहतूक करणारे वाहन अडवले. त्यात मुंबईहून आलेल्या १३ जणांना पोलिसांनी अटक करून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी भरती केले.महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे. बस, रेल्वेसह खासगी वाहतूकही बंद केली आहे. फक्त अत्यावश्य्क सेवा सुरु आहेत. याचाच गैरफायदा घेऊन काही खासगी वाहनचालक प्रवाशी वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. मालाऐवजी चक्क १३ जणांना मुंबईहून एम.एच.०२ एफ.जी.२०९४ या नंबरच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून आणण्यात येत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलिसांनी त्यांना थांबविले. कलम १४४ ची अंमलबजावणी करतांना संशय म्हणून मागील फाटक उघडले असता त्या वाहनामध्ये मालाऐवजी १३ जण आढळून आले. सर्व मुंबईवरून मलकापूर मार्गे युपी साठी निघाले होते. पोलिसांनी झाडाझडती घेवून त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
मालवाहकातून मुंबईहून आलेल्या १३ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:02 PM