डोणगावमध्ये कोणतीही निवडणूक असो त्यात रंगत येतेच. राजकीय डावपेचची सुरुवात उमेदवार छाननीमध्ये दिसून आली. येथील वाॅर्ड क्रमांक एकमध्ये महिलांचा मागास प्रवर्गात एकच अर्ज राहिला होता. त्यामुळे १६ उमेदवारांसाठीच ही लढत होईल का, असे चित्र दिसत असतानाच ४ जानेवारी रोजी एका उमेदवारास महिलांच्या मागास प्रवर्गात निवडणूक लढण्यास न्यायालयाने अनुमती दिली. त्यामुळे ही निवडणूक आता १७ उमेदवारांसाठी होईल, हे स्पष्ट झाले आहे. डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनाप्रणीत डोणगाव विकास पॅनलचे १७ उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसप्रणीत ग्रामविकास आघाडीचे १७ उमेदवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजप यांच्या जलमित्र पॅनलचे ८ उमेदवार, तर अपक्ष १३ असे ५५ उमेदवार रिंगणात आहेत. यात वाॅर्ड क्रमांक एकमध्ये नऊ उमेदवार आहेत. त्यात तीन अपक्ष, वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये १२ उमेदवार असून, यात तीन अपक्ष, वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये सात उमेदवार असून, यामध्ये तीन अपक्ष, वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये ११ उमेदवार असून दोन अपक्ष, वाॅर्ड क्रमांक सहामध्ये नऊ उमेदवार असून, दोन अपक्ष आहेत.
सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. काही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. काहींनी सोशल मीडियावर जोर दिला आहे.
अपक्ष उमेदवारांचा परिणाम
डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा इतिहास पाहता पहिल्यांदाच येथे १३ उमेदवार अपक्ष आहेत. हे अपक्ष उमेदवार कोणाचे गणित बिघडवतील तर काही ठिकाणी अनपेक्षित निकालही समोर येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीच्या आधीच फटाके
वाॅर्ड क्रमांक एकमधील महिलांच्या मागास प्रवर्गात फक्त एकच अर्ज शिल्लक राहिला होता. त्यामुळे या जागेवर लढत होईल की नाही ही शंका होती. यावर अर्ज चुकून पुरुषाचा मागास प्रवर्गात गेलेले उमेदवार ह हे अर्ज महिलांच्या मागास प्रवर्गात घेण्यात यावा, यासाठी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने त्यांना दिलासा देऊन महिलांच्या मागास प्रवर्गात निवडणूक लढण्याची संधी दिली. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच फटाके फुटले.